Maharashtra Weather : देशात जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा मान्सून काळ असतो. या चार महिन्यांच्या मान्सून काळात मात्र यंदा महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
परिणामी राज्यातील बहुतांशी भागात यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे राज्य शासनाने राज्यातील बहुतांशी भागात दुष्काळ जाहीर केला आहे. यंदा राज्यातील काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी देखील मोठी भटकंती करावी लागणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
मात्र मान्सून काळात महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेला पाऊस आता मान्सूनोत्तर धुमाकूळ घालत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला होता. काही ठिकाणी गारपीट देखील झाली होती. गेल्या महिन्याच्या शेवटी हवामान खात्याने डिसेंबर महिन्यात मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहिल असा अंदाज दिला होता. पण डिसेंबरच्या अगदी सुरुवातीलाच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर देखील परिणाम झाला.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार झाले आणि यामुळे देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. यामुळे आपल्या राज्यातही हलका पाऊस झाला आहे. आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांमधून पावसाने काढता पाय घेतला आहे.
तथापि राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट अजूनही पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. हवामान खात्याने 10 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान राज्यातील हवामान कसे राहू शकते याबाबत माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 13 डिसेंबर पर्यंत काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज देखील राज्यासह देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या मालदीव परिसरात चक्रीवादळामुळे पुढील चार ते पाच दिवसांत केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे. तसेच आज राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
शिवाय 13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार असे हवामान खात्याने आपल्या बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. राज्यातील कोकण, विदर्भ विभागात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील या विभागातील शेतकऱ्यांना आणखी काही काळ आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच उर्वरित राज्यात मात्र हळूहळू थंडीचा जोर वाढेल असा अंदाज आहे.