January Weather Update : गेल्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी लागली. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील अवकाळी पाऊस बरसला. काही ठिकाणी तर अक्षरशः गारपीट देखील झाली होती. शिवाय डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली.
अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. रब्बी पिकांचे आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहिले आहे.
शिवाय राज्यात थंडीचा जोर देखील वाढू लागला आहे. अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी जानेवारी महिन्यात कसे हवामान राहणार ? अवकाळी पाऊस हजेरी लावणार की नाही याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार 30 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. या कालावधीमध्ये राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे.
तसेच या कालावधीमध्ये राज्यात गारठा वाढण्याची शक्यता आहे. पंजाबरावांनी उत्तरेकडून जोरदार वारे वाहत असल्याने याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रात सध्या गारठा वाढत असल्याचे सांगितले आहे.
मात्र, डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार नसला तरी देखील नवीन वर्षाची सुरुवात अवकाळी पावसानेच होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अर्थातच जानेवारी महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना विशेष सावध आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
भारतीय हवामान विभाग काय म्हणतंय
भारतीय हवामान विभागाने देखील आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज दिला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे सध्या देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी सुरू आहे.
शिवाय जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये बर्फ वृष्टी देखील होत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार थंडी पडत आहे. तर दुसरीकडे तामिळनाडूसहित दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.
याचा परिणाम म्हणून दक्षिणेकडून महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये रात्रीच्या किमान तापमानात थोडीशी वाढ होऊ लागली आहे. म्हणून कोकण, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात थंडीचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.