Kanda Anudan Maharashtra News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांदा दराचा मोठा फटका बसला होता. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याला खूपच कवडीमोल भाव मिळत होता. यामुळे त्यावेळी कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अक्षरशः उत्पादनाचा खर्च देखील भरून काढता आला नाही.
परिणामी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची मागणी करण्यात आली. त्यावेळी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदानाची घोषणा केली.
सरकारने एक फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या काळात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल प्रतिक शेतकरी 200 क्विंटल च्या मर्यादेत अनुदान जाहीर केले. 27 मार्च 2023 रोजी हा निर्णय घेण्यात आला. यानंतर शेतकऱ्यांना कांदा अनुदान मागणीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
3 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान शेतकऱ्यांनी कांदा अनुदान मागणीचे प्रस्ताव सादर केलेत. मात्र आता या अनुदानाची घोषणा होऊन जवळपास सहा महिन्यापेक्षा अधिकचा काळ उलटला आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचा पैसा वर्ग झालेला नाही. दरम्यान या अनुदानासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाने 466 कोटी रुपयांचा निधी पणन विभागाकडे वळता केला आहे.
त्यामुळे पणन विभागाकडून लवकरच राज्यातील पात्र शेतकऱ्यांचा खात्यात कांदा अनुदानाचा पैसा जमा होणार आहे. अशातच मंत्री दादा भुसे यांनी कांदा अनुदानाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. भुसे यांनी सांगितले की अनुदान वितरण करण्यासाठी आवश्यक कारवाई सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना आता दोन टप्प्यात अनुदान मिळणार आहे.
अनुदानापासून कोणीच वंचित राहणार नाही असे देखील भुसे यांनी यावेळी नमूद केले. अनुदानापासून कोणताही शेतकरी वंचित राहता कामा नये यासाठी संबंधित यंत्रणेला भुसे यांच्याकडून सूचनानिर्गमित झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्याचा विचार केला असता जिल्ह्यासाठी 435 कोटी रुपये कांदा अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
हे अनुदान आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे वितरित केले जाणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान दोन टप्प्यात मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील अनुदान येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासाठी निधी मंजूर केला जाणार असल्याची माहिती भुसे यांनी दिली आहे.
कसं होणार अनुदानाचे वितरण
राज्यातील 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदानासाठी 857 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पण राज्य शासनाकडून पावसाळी अधिवेशनात 510 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अनुदान वितरित करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 466 कोटी रुपयांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
या मंजूर करण्यात आलेल्या निधीतून आता राज्यभरातील 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले जाणार आहे. यामध्ये राज्यातील तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानाची रक्कम मिळणार आहे तर दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दोन टप्प्यात मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.