Kanda Market 2023 : नुकताच देशात दिवाळीचा मोठा सण सेलिब्रेट झाला आहे. दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना पैशांची निकडं होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा, सोयाबीन, कापूस यांसारख्या शेतमालांची विक्री झाली आहे.
मात्र दिवाळीच्या पूर्वी सोयाबीन आणि कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात दबावत होते. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता दिवाळीनंतर सोयाबीन आणि कापूस दरात सुधारणा होईल अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना लागून आहे.
दरम्यान दिवाळीनंतर आता पुन्हा एकदा बाजार समित्यांमध्ये शेतीमालाचे लिलाव होऊ लागले आहेत. तसेच दिवाळीनंतर काही शेतमालाचे भाव वाढले आहेत. हरभरा आणि कांद्याच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून सुधारणा पाहायला मिळत आहे.
सोयाबीन दरात देखील थोडीशी सुधारणा झाली आहे. सोयाबीनचे भाव दोनशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढले आहेत. कांद्याच्या बाबतीतही अशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. राज्यात कांद्याला आता चांगला भाव मिळू लागला आहे.
काल राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी 6000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता. विशेष बाब अशी की आजही राज्यातील या बाजारात कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे.
यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये थोडेसे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने आता कुठे शेतकऱ्यांची दिवाळी सुरू झाली आहे. दिवाळीनंतर बाजारभावात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे काही कांदा व्यापाऱ्यांनी कांद्याचे बाजार भाव किमान डिसेंबरपर्यंत तेजीत राहतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इजिप्त या देशाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे.
पुढील तीन महिन्यांसाठी इजिप्तने कांदा निर्यात बंदी केली आहे. याचा परिणाम म्हणून इजिप्त देशातून आता भारतात कांद्याची आयात होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे साहजिकच कांदा बाजारभाव असेच राहतील अशी शक्यता आहे. इजिप्तने डिसेंबर पर्यंत कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला असल्याने डिसेंबर पर्यंत ही भाव वाढ कायम राहू शकते असा अंदाज आहे.
सोलापूर बाजारात कांद्याला काय भाव मिळाला
आज सोलापूर एपीएमसी मध्ये 17212 क्विंटल एवढी लाल कांदा आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 100, कमाल 6100 आणि सरासरी 3600 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.
तथापि राज्यातील इतर बाजारात अजूनही कमाल बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल आणि पाच हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमीच आहेत. यामुळे राज्यातील इतरही बाजारात भाव वाढ झाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. तसेच कांद्याला किमान 5000 रुपयाचा सरासरी भाव मिळाला तरच कांद्याचे पीक परवडणार अशी भावना शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.