Kanda Market News : गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे भाव चांगलेच पडले होते. खरंतर गेल्या महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळाला होता. सुरुवातीचे दोन आठवडे बाजारात मोठी तेजी होती. मात्र तदनंतर केंद्रशासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा मोठा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे देशातून होणारी कांद्याची निर्यात मंदावली. याचा परिणाम म्हणून कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी थांबवली. निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी होणारा कांदा खूपच कमी प्रमाणात खरेदी होऊ लागला. यामुळे साहजिकच देशांतर्गत कांद्याचा साठा वाढला आणि याचा परिणाम म्हणून दरात घसरण होऊ लागली होती.
मात्र आता पुन्हा एकदा बाजार भावात तेजी आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे चेहरे देखील खुलून उठले आहेत. सध्या शेतकऱ्यांमध्ये कांदा बाजार भावात वाढ होत असल्याने समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काल झालेल्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या बाजारात कांद्याला चांगला भाव मिळाला आहे.
यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. खरंतर आता शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा अंतिम टप्प्यात आला आहे. चाळींमधील कांदा येत्या काही दिवसात संपणार आहे. मात्र सरते शेवटी का होईना आता चांगला दर मिळत असल्याने उत्पादकांचे चेहरे खुलले आहेत.
सोमवारी घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 56 हजार 700 गोण्यांची आवक झाली होती. काल या मार्केटमध्ये कांद्याला 2200 प्रतिक्विंटल ते 2222 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. विशेष म्हणजे काही उच्च प्रतीच्या मालाला 2700 प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळाला आहे. यामध्ये गोल्टा कांदा 1500 रुपये प्रति क्विंटल ते 2200 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला गेला.
एकंदरीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला काल बाजारात चांगला भाव मिळाला असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठे समाधानी आहेत. व्यापाऱ्यांनी मालाची मागणी वाढली असल्याने बाजारभावात सातत्याने वाढ होत असल्याचे सांगितले आहे.