Maharashtra Airport : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. प्रामुख्याने दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न झाले आहेत. रस्ते रेल्वे आणि विमान वाहतूक सुरळीत बनवण्याचा प्रयत्न झाला आहे. या अनुषंगाने अनेक महत्त्वाची प्रकल्प गेल्या काही वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत.
प्रामुख्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक आधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे. ज्या भागात रेल्वे पोहोचलेली नव्हती त्या भागात नवीन रेल्वे मार्ग तयार झाले आहेत. अस्तित्वात असलेले रेल्वे मार्ग विस्तारले गेले आहेत. रेल्वे ट्रॅकचे मजबुतीकरण झाले आहे यामुळे रेल्वे गाड्यांचा वेग वाढत आहे.
वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे येत्या दोन-तीन वर्षात बुलेट ट्रेन देखील धावताना दिसणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर पहिली बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. याशिवाय रस्ते विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर समृद्धी महामार्गासारखे रस्ते आता आपल्या महाराष्ट्राला मिळाले आहेत.
विशेष म्हणजे समृद्धी महामार्गापेक्षा 100 किलोमीटर अधिक लांबीचा शक्तीपीठ महामार्गाची पायाभरणी देखील लवकरच होणार अशी आशा आहे. कारण की या मार्गाचे फायनल अलाइनमेंट नुकतेच राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्याचे काम देखील येत्या सहा महिन्यात पूर्ण होणार असे सांगितले जात आहे.
यामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. राज्यात छोटे मोठे अनेक रस्ते तयार झाले आहेत. विशेष म्हणजे विमान सेवा देखील मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या अनुषंगाने राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये विमानतळ तयार केले जातात. पुण्यात नव्या टर्मिनल चे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात या टर्मिनल चे उद्घाटन होणार आहे.
इकडे नवी मुंबईमध्ये देखील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत आहे. याशिवाय सोलापुरातही विमानतळ तयार केले जात आहे. दरम्यान याच सोलापुराच्या विमानतळाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खरेतर विमानसेवा नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या शहराला मोठा फटका बसत आहे यात शंकाच नाही.
विमानसेवा नसल्याने सोलापूर शहराचा विकास काहीसा खुंटलेला पाहायला मिळतो. होटगी रोड विमानतळ की बोरामणी विमानतळ यामध्येच विमानतळाचा प्रश्न अडकलेला आहे. मात्र हा प्रश्न लवकरच सुटेल आणि सोलापूरकरांना विमान सेवेचा लाभ घेता येईल अशी आशा व्यक्त होत आहे. कारण की आता होटगी रोड विमानतळावरून लवकरच विमान सेवा सुरू होणार अशी शक्यता आहे.
होटगी रोड विमानतळावरील धावपट्टी, संरक्षक भिंत व प्रशासकीय इमारतीची कामे सुरू आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होतील. मात्र यानंतर विमानतळाला वाहतूक परवाना मिळवण्यासाठी केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे बोरामणी विमानतळासाठी देखील 575 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण करण्यात आले आहे.
मात्र या विमानतळासाठी 33 हेक्टर जमिनीचे निर्वनीकरण होणे आवश्यक आहे. मात्र याबाबतचा प्रस्ताव केंद्राच्या पर्यावरण समितीने फेटाळून लावला आहे. तेव्हापासून मात्र याबाबतचा प्रस्ताव अजूनही पर्यावरण समितीकडे गेलेला नाही. यामुळे बोरामणी विमानतळ खरंच होणार का हा प्रश्न कायम आहे.
दुसरीकडे होटगी रोड विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या विमानतळावर 2 हजार 100 मीटरची धावपट्टी अर्थातच रनवे आहे. त्यामुळे ही धावपट्टी आंतरराष्ट्रीय विमान सेवेसाठी देखील फायद्याची राहणार आहे. तथापि, हे विमानतळ वाहतुकीसाठी केव्हा सुरू होणार हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.