Maharashtra Banking News : महाराष्ट्रासाठी एक अतिशय मोठी आणि खळबळ जनक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील एका मोठ्या सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत.
खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेत दोनशे कोटीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. अशातच आता औरंगाबाद शहरातील एका बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून निर्बंध लादण्यात आले आहेत.
यामुळे संबंधित बँकेतील खातेधारकांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर संबंधित बँकेतील ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बँकेवर आरबीआय ने निर्बंध लावल्याचे समजताच ग्राहकांनी बँकेत तोबा गर्दी केली आहे.
कोणत्या बँकेवर लावलेत निर्बंध
मिळालेल्या माहितीनुसार रिझर्व बँक ऑफ इंडिया ने औरंगाबाद शहरातील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव बँक या सहकारी बँकेवर निर्बंध लावले आहेत. शहरातील जुना मोंढा येथील जाधवमंडी परिसरात वसलेल्या या बँकेवर निर्बंध लावण्यात आले असून यामुळे सध्या या बँकेत ठेवी असलेल्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
यामुळे बँकेत सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आरबीआयने याबाबत काल अर्थातच 29 ऑगस्ट 2023 रोजी निर्णय घेतला आहे. यासाठी आरबीआय ने काल प्रसिद्धी पत्रक निर्गमित केले आहे. RBI ने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात या बँकेला नवीन कर्जवितरण करण्यासह अग्रिमांचे नूतनीकरण, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक आणि नवीन ठेवी स्वीकरता येणार नाहीत असे नमूद करण्यात आले आहे.
तसेच या प्रसिद्धी पत्रकातुन सदर बँकेवर पुढील सहा महिने निर्बंध राहणार अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान आरबीआय ने घेतलेल्या या निर्णयावर संबंधित बँकेच्या संचालक मंडळाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बँकेला आता आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतेच काम करता येणार नाहीये.
आरबीआय ने पुढील सहा महिन्यांसाठी या बँकेतील सर्व व्यवहारांवर बंदी घातली आहे. यामुळे या बँकेत ठेवी असलेल्या ग्राहकांचे लाखो रुपये आता बँकेत अडकले आहेत. परिणामी ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून या बँकेतील ग्राहकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे.