Maharashtra Banking News : बँकिंग क्षेत्रात एक मोठी खळबळ माजवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या बँकेचा लायसन्स अर्थातच परवाना रद्द केला आहे. अशा परिस्थितीत सदर बँकेच्या खातेधारकांमध्ये मोठी संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.
खरंतर रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून वेळोवेळी देशभरातील बँकेच्या पात्रता तपासल्या जातात. जर बँका रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या नियमांचे तसेच निकषांचे पालन करत नसतील तर बँकांना अपात्र केले जाते. अशा बँकांच्या सर्व प्रकारच्या व्यवहारावर निर्बंध घालण्याचे अधिकार आरबीआयला आहेत.
याच अधिकाराचा वापर करून आरबीआयने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआय ने मुंबईमधील एका महत्त्वाच्या सहकारी बँकेचा थेट परवानाच रद्द केला आहे. आरबीआय ने मुंबईमधील द कपॉल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड (The Kapol Co-operative Bank) या बँकेचा परवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
यामुळे कपोल को-ऑपरेटिव बँक लिमिटेडच्या सभासदांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. खातेधारक सध्या संभ्रमा अवस्थेत आहेत. दरम्यान आरबीआय ने सदर बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने आणि कमाई होण्याची कोणतीही आशा नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने याबाबत सविस्तर परिपत्रक देखील निर्गमित केले आहे.
सदर परिपत्रकानुसार, बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले असल्याने आता या बँकेत कोणत्याच प्रकारचे व्यवहार होणार नाहीत. बँकेतील सर्व प्रकारच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि ठेवी परत करणे यांचा देखील समावेश आहे. याचाच अर्थ सदर बँकेच्या खातेधारकांना बँकेतून पैसे देखील काढता येणार नाहीत.
सहकार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक यांना ही बँक बंद करण्याचे आदेश जारी करून बँकेसाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती करण्यात आली आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेने अधिक माहिती देताना सांगितले की या बँकेतील प्रत्येक खातेधारकांना विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार राहणार आहे.
यामध्ये बँकेच्या सुमारे 96.09 टक्के ठेवीदारांना त्यांची संपूर्ण ठेव रक्कम DICGC कडून मिळण्याचा अधिकार राहणार आहे. दरम्यान आरबीआयने (RBI) म्हटले आहे की, या बँकेच्या ठेवीदाराला त्याच्या एकूण ठेवींमधून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी दिली जाणार नाही.
निश्चितच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयानंतर या बँकेच्या खातेधारकांमध्ये मोठी संभ्रमावस्था तयार झाली आहे. सध्या या बँकेचे खातेधारक चिंतेत असून बँकेच्या मुख्य शाखांमध्ये खातेधारकांची मोठी गर्दी देखील होत आहे.