Maharashtra Breaking : भाषिक प्रांत वार रचना झाल्यानंतर 1960 मध्ये मराठी भाषीकांचा प्रदेश म्हणून नवीन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ज्यावेळी नवीन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी राज्यातील जिल्ह्यांची संख्या होती 26. यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने या 26 जिल्ह्यांपैकी मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.
मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून आत्तापर्यंत नवीन दहा जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे. अर्थातच सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या आणि भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करण्याची मागणी आहे. खरतर ही मागणी खूपच जुनी आहे. मात्र या जुन्या मागणीने आता नव्याने जोर पकडला आहे. राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यासाठी नवीन अप्पर जिल्हाधिकारी हे पद तयार केले आहे.
विशेष बाब म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने अहमदनगर जिल्हा विभाजनासाठी तयारी सुरू केल्या असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. तसेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मालेगाव दौरा केला असता त्यावेळी मालेगाव तालुक्याचा उल्लेख त्यांनी मालेगाव जिल्हा असा केला.
यामुळे नाशिक जिल्ह्याचे विभाजन करत मालेगाव हा नवीन जिल्हा बनवला जाऊ शकतो अशा देखील चर्चा सध्या सुरू आहेत. खरंतर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या विभाजनाच्या चर्चा फारच जुन्या आहेत मात्र नव्याने सत्तेत आलेल्या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या काही निर्णयामुळे आणि वक्तव्यामुळे राज्यातील मोठ्या जिल्ह्याचे लवकरात लवकर विभाजन करण्याचे संकेत मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या माध्यमातून राज्यातील मोठ्या जिल्ह्यांच्या विभाजनाचा डाव साधला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी काही मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून राज्यात नवीन 22 जिल्हे तयार करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच राज्यात जवळपास 58 जिल्हे तयार होणार आहेत.
विशेष म्हणजे ही संख्या वाढून 67 पर्यंत होऊ शकते असे देखील मत व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रातील जिल्हा विभाजनाबाबतची आतापर्यंतची स्थिती जाणून घेणार आहोत तसेच राज्यात कोणत्या नवीन 22 जिल्ह्यांची मागणी होत आहे याबाबत देखील सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यावेळी 26 जिल्ह्यांचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र राज्य उदयास आले. ठाणे, कुलाबा (रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा (आताचे नाव चंद्रपूर) असे एकूण 26 जिल्हे मिळून महाराष्ट्र राज्य तयार झाले. यानंतर मग टप्प्याटप्प्याने गरजेनुसार आणि मागणीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन दहा जिल्हे तयार करण्यात आले आहेत.
हे नवीन 10 जिल्हे तयार झालेत
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एक मे 1960 ते 1980 पर्यंत राज्यात कोणत्याच नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली नाही. म्हणजेच महाराष्ट्र राज्य तयार झाल्यानंतर सुरुवातीचे वीस वर्ष राज्यात केवळ 26 जिल्हे होते. मात्र 1980 पासून नवीन जिल्हे तयार होण्यास सुरुवात झाली. यात 1981 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद म्हणजेच आत्ताचे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे विभाजन करून जालना हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला.
यानंतर 16 ऑगस्ट 1982 साली उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून लातूर हा जिल्हा तयार झाला तसेच 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला.
यानंतर एक ऑक्टोबर 1990 ला महाराष्ट्र राज्य शासनाने बृहन्मुंबईचे विभाजन करत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे तयार झालेत. यानंतर एक जुलै 1998 रोजी युती सरकारच्या काळात अकोला जिल्ह्याचे विभाजन झाले आणि वासिम आणि धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा नवीन जिल्हा तयार झाला.
या जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या 33 इतकी झाली. यानंतर एका वर्षाच्या काळातच म्हणजेच एक मे 1999 ला परभणी जिल्ह्यातून हिंगोली आणि भंडारा जिल्ह्यातून गोंदिया हे जिल्हे तयार झालेत. अशा पद्धतीने 1999 पर्यंत महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या 35 इतकी झाली. यानंतर मग 2014 मध्ये महाराष्ट्रात आणखी एक नवीन जिल्हा तयार झाला.
एक ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचे विभाजन करत पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. ऑगस्ट 2014 मध्ये महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे तयार झालेत. तेव्हापासून महाराष्ट्रात एकही नवीन जिल्हा तयार झालेला नाही. पण आता महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे तयार होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. अशा स्थितीत आज आपण नव्याने प्रस्तावित 22 जिल्हे कोणते आहेत याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
नवीन प्रस्तावित 22 जिल्हे कोणते
शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात जिल्हा विभाजनाची मागणी लक्षात घेता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जिल्हा विभाजनाच्या संदर्भात एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने राज्यातील वेगवेगळ्या भागातील जिल्हा विभाजनाच्या मागणीनुसार राज्यात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुके तयार करण्याची गरज असल्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
यानुसार, नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याचे त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव असून यानुसार शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर हे तीन नवीन जिल्हे तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण हे दोन जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहे. पालघर जिल्ह्याचे विभाजन करून जव्हार हा नवीन जिल्हा प्रस्तावित करण्यात आला आहे.
यासोबतच पुण्यातून शिवनेरी, रायगड मधून महाड, सातारा मधून माणदेश, रत्नागिरी मधून मानगड, बीड मधून आंबेजोगाई, लातूर मधून उदगीर, नांदेड मधून किनवट, जळगाव मधून भुसावळ, बुलढाणा मधून खामगाव, अमरावती मधून अचलपूर, यवतमाळ मधून पुसद, भंडारा मधून साकोली, चंद्रपूर मधून चिमूर आणि गडचिरोली मधून अहेरी या एकूण 22 जिल्ह्यांचे विभाजन करण्याचे सदर समितीच्या प्रस्तावात नमूद असल्याचे सांगितले जात आहे.