Maharashtra Driving Licence : जर तुम्हीही दुचाकी चालवत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. खरंतर, आपल्या राज्यात तसेच देशात वाहतुकी संदर्भात विविध नियम परिवहन विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत. यानुसार वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक असतो.
हा वाहन परवाना 18 वर्षांवरील नागरिकांना दिला जातो. मात्र आता दुचाकीच्या ड्रायव्हिंग लायसन्सबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता काही लोकांना दुचाकीचे ड्रायव्हिंग लायसन्स हे तब्बल वयाच्या 25 व्या वर्षानंतरच प्राप्त करता येणार आहे.
आता तुम्हाला नक्कीच असा प्रश्न पडला असेल की कोणत्या लोकांना वयाच्या 25 व्या वर्षानंतर ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया कोणाला लागू होणार आहे हा नियम.आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्याच्या परिवहन आयुक्तांनी नुकताच एक महत्त्वाचा आदेश निर्गमित केला आहे.
या आदेशात जर कोणी व्यक्ती जो अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल तो दुचाकी चालवताना आढळला तर अशा व्यक्तीकडून 25 हजार रुपये दंड स्वरूपात वसूल करा आणि या व्यक्तीला जोपर्यंत त्याचे 25 वर्षे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स देऊ नका असे नमूद करण्यात आले आहे.
परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व आरटीओं कार्यालयांना हा आदेश बजावला आहे. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले की, मोटर वाहन कायदा 2019 अंतर्गत हा आदेश पारित करण्यात आला आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 च्या या कायद्यात अल्पवयीन मुले जर दुचाकी चालवताना आढळले तर त्याच्या पालकास किंवा गाडीच्या मालकास तीन वर्ष तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.
तसेच दुचाकी चालवणारा मुलगा किंवा मुलगी यास वयाची 25 वे वर्षे पूर्ण करेपर्यंत वाहन परवाना देऊ नये असे या कायद्यात म्हटले आहे. यानुसार आता या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन आयुक्तांनी हा आदेश पारित केला आहे.
म्हणजे आता अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी जर दुचाकी चालवत असेल तर अशा मुलाला किंवा मुलींला वयाच्या 25 व्या वर्षानंतरच ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वाहन परवाना मिळणार आहे. यामुळे अल्पवयीन मुलांनी ज्या दुचाकीसाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता आहे ती दुचाकी चालवू नये हेच त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहे.