Maharashtra Expressway News : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली असून अजूनही अनेक रस्ते विकासाची कामे प्रगतीपथावर आहेत. यामुळे राज्यातील रस्ते वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे. अशातच मात्र एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोर वरंधा घाटातील भोर-महाड रस्ता एक एप्रिल पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रायगड जिल्हाधिकारी महोदय यांनी घेतलेल्या नवीन निर्णयानुसार हा रस्ता पुढील दोन महिने बंद राहणार आहे. हा घाट मार्ग रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्याचा निर्णय झालेला आहे.
यामुळे कोकणातून पुण्याला येणाऱ्या आणि पुण्यातून कोकणाला जाणाऱ्या प्रवाशांना तथा पर्यटकांना मोठा फटका बसणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष बाब अशी की, हा घाट मार्ग बंद राहणार असल्याने राज्यमार्ग परिवहन महामंडळाने देखील या मार्गावरील अनेक बसेस रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेतलेला आहे.
एसटी महामंडळाने या मार्गावरील 11 गाड्या रद्द केल्या आहेत. हा घाट मार्ग एक एप्रिल ते 30 मे या कालावधीत दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीडी वरंधा (ता. महाड, जि. रायगड) रायगड जिल्हा हद्द या वरंधा घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे.
हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करायचे असेल तर या घाटमार्गातील वाहतूक बंद करणे आवश्यक आहे.
घाट मार्गातील वाहतूक बंद राहिली तर जलद गतीने काम करता येणार आहे आणि अपघाताची देखील भीती राहणार नाही. यामुळे हा घाटमार्ग कालपासून बंद झाला असून 31 मे पर्यंत हा घाट मार्ग असाच बंद राहील अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान हा घाटमार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने भोर-महाड बस, पुणे डेपोची पिंपरी चिंचवड ते खेड, पिंपरी चिंचवड ते अहिरेवाडी, पिंपरी चिंचवड ते माखजन, पिंपरी चिंचवड ते दापोली, पुणे ते महाड, जळगाव ते महाड, आंबेजोगाई ते खेड, पोलादपूर ते पुणे, महाड ते पुणे या 11 बस गाड्या देखील रद्द करण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतलेला आहे.
यामुळे मात्र कोकणातून पुण्याला आणि पुण्याला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.