Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक सोयीची झाली आहे. राज्यात मोठमोठ्या महामार्गांची कामे सुरू आहेत. तसेच काही रस्त्यांची दुरुस्तीची कामे देखील केली जात आहेत. यात वरंधा घाटातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीत २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.
या घाट सेक्शन मध्ये रस्त्याचे दुपदरीकरण, संरक्षक भिंत बांधणे तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. याच कामांसाठी प्रशासनाने एक एप्रिल पासून हा घाट मार्ग 30 मे पर्यंत बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
म्हणजे जवळपास दोन महिने हा घाट मार्ग बंद करण्यात आला होता. घाट सेक्शन मध्ये काम करताना अपघाताची घटना घडू नये यासाठी हा मार्ग बंद करण्यात आला होता.
मात्र उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक वरंधा घाट मार्गाने प्रवास करत असतात. हा घाट मार्ग पुणे आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाचा आणि जवळचा मार्ग आहे.
पुण्यातून कोकणात जाणारे आणि कोकणातून पुण्याला येणारे बहुतांशी नागरिक याच घाट मार्गाने प्रवास करतात. मात्र ऐन उन्हाळ्यातच हा घाट मार्ग बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आपल्या मूळ गावी परतणाऱ्यांना नागरिकांसाठी हा घाट मार्ग काही दिवस सुरु करावा अशी मागणी केली जात होती.
दरम्यान निवडणूक, उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईचा सीजन पाहता प्रशासनाने एक मे पासून काही दिवस हा घाट मार्ग पुन्हा एकदा वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता हा घाट मार्ग पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाट सेक्शन मधील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा घाट मार्ग पुन्हा एकदा बंद केला गेला आहे.
खरे तर वरंधा घाट मार्गे पुण्याहून मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणाला जात असतात. आता मात्र या पर्यटकांना इतर पर्यायी मार्गाने जावे लागणार आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आता पुणे – पिरंगुट – ताम्हिणी घाट – निजामपूर रोड- माणगाव- राजेवाडी फाटा या मार्गाने प्रवाशांनी प्रवास करावा. तसेच पुणे – सातारा महामार्ग – वाई -आंबेनळी घाट – पोलादपूर या पर्यायी मार्गाने प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.