Maharashtra Expressway News : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुणे, कोल्हापूर येथून कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. कोकणातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक पुणे, कोल्हापूर या भागात हजेरी लावत असतात. पुणे ते कोकण असा प्रवास करण्यासाठी भोर-महाड-वरंधा घाट यां मार्गाचा वापर अधिक होत आहे.
हा मार्ग खूपच सुंदर आहे, या मार्गाच्या आजूबाजूचा निसर्ग, धबधबे मनाला अगदीच मंत्रमुग्ध करतात. मात्र हा पुणे आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील राजेवाडी वाघजाई मंदिर येथे दरड कोसळल्याने अन परिणामी रस्ता खचल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माहिती दिली असून यासंदर्भातील अधिसूचना देखील नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार हा रस्ता आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत बंद ठेवला जाणार आहे. खरे तर महाड तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे.
या भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. यामुळे या घाटमार्ग सेक्शन मध्ये झाड, दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे राजेवाडी वाघजाई मंदिर या ठिकाणी दरडही कोसळली आहे. यामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
हा रस्ता 31 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार असून या कालावधीत प्रवाशांना इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. कोकणातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनी महाड-माणगाव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे या मार्गाने प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी राजेवाडी फाटा- पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड -कोल्हापूर या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे प्रशासनाकडून सांगितले गेले आहे.
एकंदरीत पावसाळी काळात घाट सेक्शन मध्ये अपघाताची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील हा एक महत्त्वाचा घाट मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी आगामी काही दिवस बंद राहणार आहे.
यामुळे निश्चितच नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो मात्र हा घाट मार्ग असाचं सुरू ठेवला तर जीवित हानी होण्याची शक्यता सुद्धा आहे.
यामुळे जिल्हा प्रशासनाने हा घाट मार्ग आगामी काही दिवसांसाठी बंद करण्याचा मोठा निर्णय यावेळी घेतला आहे. यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून प्रशासनाला पुरेपूर सहकार्य करावे.