Maharashtra Expressway News : राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध रस्ते विकासाचे कामे केली जात आहेत. मोठमोठ्या महामार्गांची कामे पूर्ण केली जात आहेत. यामुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील रस्ते वाहतूक आता आधीच्या तुलनेत मजबूत भासू लागली आहेत.
मात्र असे असले तरी अजूनही राज्यात असेही अनेक मार्ग आहेत जें खूपच खराब झाले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. अशातच आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक महत्त्वाचा घाट मार्ग आता बंद केला जाणार आहे.
खरंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे दोन विभाग परस्परांना जोडणारा करुळ घाट मार्ग आता दुरुस्तीच्या कामांसाठी बंद केला जाणार आहे. या घाट मार्गावर सर्रासपणे जीवनआवश्यक वस्तूंची आणि अवजड वाहनांची वाहतूक होते. यामुळे या घाट मार्गातील रस्त्यांची चाळण तयार झाली आहे.
परिणामी घाटात वाहतूक कोंडी होत आहे आणि अपघात होण्याची भीती देखील आहे. यामुळे आता करूळ घाटात काँक्रिटीकरणाचे काम केले जाणार आहे. काँक्रिटीकरणपूर्वी आवश्यक असलेल्या पूर्वतयारीचे काम देखील सुरू झाले आहे. मात्र काँक्रिटीकरणाच्या कामासाठी हा घाट बंद करावा लागणार आहे.
यासाठी आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे हा घाट मार्ग बंद करण्यासाठी परवानगी मागितली गेली आहे. एकदा की जिल्हाधिकाऱ्यांनी ही परवानगी दिली की हा घाट बंद केला जाणार आहे. जोपर्यंत या घाटमार्गातील काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा घाट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
यामुळे दैनंदिन कामानिमित्त या घाट मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. खरे तर या घाटमार्गातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, पावसाळ्यात तर या घाटात दरडी देखील कोसळतात. यामुळे या घाटमार्गाची दुरुस्ती करणे आवश्यक होते.
म्हणून आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करूळ घाटमार्गासह 21 किलोमीटर लांबीच्या 249 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तळेरे-वैभववाडी, नाधवडे-कोकिसरे येथे खराब झालेला रस्ता आणि करुळ घाट येथील 21 किलोमीटर लांबीचा रस्ता आता काँक्रिटीकरणचा बनवला जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे या संबंधित रस्त्याचे रुंदीकरण व रस्त्यावरील मोऱ्या, पूल यांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहेत. घाट मार्गातील देखील रस्त्याचे रुंदीकरण केली जात आहे. घाटात सात मीटर रुंदीचा आणि इतरत्र दहा मीटर रुंदीचा रस्ता बनवला जाणार आहे. मात्र हे काम करताना घाट मार्ग सुरू ठेवणे जोखीम पूर्ण आहे.
यामुळे आता अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्याची आणि दिवसा फक्त हलक्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. म्हणजेच रात्री हा घाट बंद करण्याची मागणी आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून अजून ही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र परवानगी मिळाली की हा घाट बंद केला जाणार आहे.
घाटमार्ग बंद केल्यानंतर यामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्ग म्हणजे फोंडाघाट तसेच भुईबावडा घाटातून वळवली जाईल अशी माहिती समोर आली आहे. हा घाट जवळपास तीन ते चार महिने बंद राहू शकतो असा दावा देखील केला जात आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निश्चितच काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.