Maharashtra Expressway : महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांत विविध विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वेगवेगळ्या महामार्गांचे उभारणी केले जात आहे. भारतमाला परियोजने अंतर्गत विविध महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेले आहे. सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेसवे देखील असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण केले जाणार आहे.
हा प्रकल्प राज्यातील नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातून प्रस्तावित करण्यात आला असून सद्यस्थितीला या महामार्गासाठीच्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. याच केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी महामार्ग प्रकल्पासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरेतर या प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मात्र अचानक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हा प्रशासनांना पत्र लिहित या प्रकल्पाचे काम सद्यस्थितीत आहे त्याच टप्प्यावर थांबवावे असे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे पुढील आदेश जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत याचे काम पुन्हा सुरू करू नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढील आदेशापर्यंत या महामार्ग प्रकल्पाचे काम रखडणार असल्याचे चित्र तयार होत आहे. यामुळे हा देखील प्रकल्प बारगळणार का? असा सवाल नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित होतोय.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक व सिन्नर या सहा तालुक्यांमध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे. जिल्ह्यात या प्रकल्पाची 122 किलोमीटर एवढी लांबी प्रस्तावित आहे. यासाठी 996 हेक्टर एवढ्या जमिनीचे संपादन प्रशासनाला करावे लागणार आहे.
विशेष म्हणजे जमिनीच्या संपादनासाठी आवश्यक प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील या संबंधित सहा तालुक्यांमध्ये या महामार्गासाठी खाजगी क्षेत्राची मोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. तसेच, जमीन अधिग्रहणासाठी आवश्यक असलेला निधी देखील तालुकास्तरावर उपलब्ध झाला आहे.
त्यामुळे लवकरात लवकर भूसंपादन होईल आणि प्रत्यक्षात मार्गाच्या कामाला सुरुवात होईल अशी आशा होती. मात्र अशा या परिस्थितीतच आता प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, देशात कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शासन स्तरावर या प्रकल्पासंदर्भात आता पुढील तीन महिने कोणताच निर्णय होणार नाही हे स्पष्ट होत आहे.
जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाहीत आणि याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आता हे प्रकरण भिजतच राहणार आहे. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला आता पुढील तीन महिने तरी ब्रेक लागणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या प्रकल्पाबाबत आता पुढे काय निर्णय होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
कसा आहे प्रकल्प
या प्रकल्पांतर्गत सुरत ते चेन्नईदरम्यान 1271 किलोमीटर लांबीचा महामार्ग तयार होणार आहे. हा संपूर्ण महामार्ग ग्रीन फिल्ड कॉरिडॉर राहणार आहे. सुरत ते सोलापूर आणि सोलापूर ते चेन्नई असे दोन टप्पे या महामार्गाचे राहतील. हा महामार्ग गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांना जोडेल. खरे तर सुरुवातीला या महामार्गासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी विरोध दाखवला होता.
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील या मार्गाचा कडाडून विरोध केला होता. मात्र शेतकऱ्यांशी बोलणी झाल्यानंतर अनेकांनी या महामार्गासाठी जमिनी देण्यास तयारी दाखवली आहे. यामुळे या महामार्गाचे काम जलद गतीने होईल अशी आशा होती. पण घडले सारे विपरीत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या महामार्गाचे काम थांबवायला सांगितले आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.