Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्गाची पायाभरणी झाली आहे. यातील काही महामार्गांचे काम पूर्ण झाले आहे तर काही महामार्गांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. समृद्धी महामार्गाचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई ते नागपूर ही दोन्ही शहरे कनेक्ट करण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे.
समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून आत्तापर्यंत 600 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते भरवीर पर्यंतच्या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून भरविर ते मुंबई पर्यंतच्या मार्गाचे काम येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या मार्गाचे काम पूर्ण केले जात असून प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार हा मार्ग या चालू वर्षातच सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाणार आहे. दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नागपूर ते गोवा या महामार्गाचे काम देखील पूर्ण केले जाणार आहे.
या महामार्गाच्या अंतिम संरेखणास अर्थातच अलाइनमेंटला नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. या अलाइनमेंटनुसार नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाची लांबी 806 किलोमीटर एवढी राहणार आहे.
आधी हा मार्ग 760 km लांबीचा बनवला जाईल असे सांगितले जात होते. मात्र, सुधारित अलाइनमेंटनुसार आता हा मार्ग 806 किलोमीटर लांबीचा एवढा राहणार हे स्पष्ट झाले आहे. हा महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे.
वर्धा येथील पवनारपासून हा महामार्ग सुरू होणार आहे तर तो थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत तयार केला जाणार आहे. हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.
हा मार्ग राज्यातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. राज्यातील तीन शक्तिपीठे आणि महत्त्वाच्या ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांना हा महामार्ग कनेक्ट करणार आहे. यामुळे राज्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार अशी आशा आहे.
विशेष म्हणजे या मार्गाचे भूसंपादन येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. दरम्यान नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग आणि प्रस्तावित कोकण ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे परस्परांना कोकणात कनेक्ट होणार आहेत.
शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर येथील आंबोली मार्गे तळ कोकणात दाखल होणार आहे. हा मार्ग बांदा येथील आरटीओच्या जवळ समाप्त होणार आहे. दरम्यान याच ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला प्रस्तावित करण्यात आलेला कोकण ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे जोडला जाणार आहे.
हा मार्ग कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार
हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पत्रादेवी (उत्तर गोवा) या जिल्ह्यांमधून जाणार आहे. या मार्गासाठी जवळपास ८३ हजार ६०० कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग 2028-29 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.