Maharashtra Ghat : राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. खरेतर गेल्या काही वर्षांपासून राज्यात वेगवेगळे रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. अनेक मोठमोठे प्रकल्प पूर्ण झाली आहे.
समृद्धी सारखा मार्ग राज्याला मिळाला आहे. यामुळे राज्यातील विकासाला गती मिळाली आहे. शिवाय सध्याचे रस्ते देखील चकाचक केले जात आहेत.
यामध्ये तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटाचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्याच्या कामाचा देखील श्रीगणेशा करण्यात आला आहे.
याशिवाय या घाटात काँक्रिटीकरणाचे काम देखील पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान हे काम करताना या घाटातून एकेरी वाहतूक शक्य ठेवणे अशक्य होणार आहे. घाट मार्गातील काम सुरू असताना वाहतूक सुरू ठेवली तर अपघात होण्याची भीती आहे.
अशा परिस्थितीत हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा घाट येत्या 22 जानेवारीपासून बंद राहणार आहे. खरं तर हा घाटमार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडतो.
यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जाताना आणि पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
हा घाट मार्ग 22 जानेवारी ते 31 मार्च पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय झालेला आहे. म्हणजे हा घाट मार्ग जवळपास अडीच महिन्याच्या कालावधीसाठी बंद केला जाणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना आता पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
निश्चितच घाट मार्गाच्या कामासाठी हा घाट बंद केला जाणार असल्याने प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे. दरम्यान आता आपण घाटमार्ग बंद झाल्यानंतर प्रवाशांना कोणत्या पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, करुळ घाटातील वाहतुक 22 जानेवारीपासून ते 31 मार्च 2024 पर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद केली जाणार आहे. यामुळे या कालावधीत घाटातील वाहतूक तरळे – फोंडाघाट – राधानगरी – कोल्हापूर या मार्गाने वळवली जाणार आहे.
तसेच प्रवासी वाहतूक तरळे – भुईबावडा – कोल्हापूर या पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सांगितले गेले आहे. तसंच, प्रवासी व अवजड वाहतुकीसाठी तरळे – वैभववाडी – अनुस्कुरा – कोल्हापूर या मार्गाचा नागरिकांना वापर करावा लागणार आहे.