Maharashtra Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी नानाविध योजना राबवल्या जात आहेत. महिलांसाठी आणि मुलींसाठी देखील शासनाने वेगवेगळ्या योजना सुरु केल्या आहेत.
महिला सक्षमीकरणासाठी शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्यात लेक लाडकी योजना राबवण्यास मान्यता दिली आहे.
या राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेअंतर्गत मुलींना एक लाख रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ पुरवला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 30 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे.
दरम्यान या योजनेचा अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. यामुळे आज आपण महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या या लेक लाडकी योजने संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणाला मिळणार लाभ
या योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. एक एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कुटुंबातील एक किंवा दोन मुली या योजनेच्या लाभासाठी पात्र राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ कुटूंबातील एक किंवा दोन मुली अथवा एक मुलगा व दुसरी मुलगी तसेच दुसऱ्या वेळेस जन्माला आलेल्या जुळ्या मुलींना मिळणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी मात्र माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
तसेच या योजनेचा लाभ फक्त ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत आहे अशाच कुटुंबातील मुलींना घेता येणार आहे. आता आपण या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम मुलींना किती टप्प्यात मिळेल याबाबत जाणून घेऊया.
कसे होणार लाभाचे वाटप
या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम मुलींना टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. या अंतर्गत मुलीच्या जन्माच्या वेळी पाच हजार रुपये, पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये, मुलगी सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये, मुलगी अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच या योजनेअंतर्गत मुलगी जन्माला आल्यापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत तिला एकूण एक लाख रुपये मिळणार आहेत.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. पिवळे किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका, मुलीच्या पालकांचे आधार कार्ड, आई – वडिलांसोबत मुलीचा फोटो, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, ई – मेल आयडी, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
अर्ज कुठे करावा लागेल
तालुक्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात यासाठी अर्ज करता येणार आहे. याशिवाय पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गावातील अंगणवाडी केंद्रात जाऊनही यासाठी अर्ज करता येणार आहे.