Maharashtra Government Scheme : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेतली होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शिंदे सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये राज्यातील मुलींसाठी आणि शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय झाले आहेत.
राज्य शासनाने आज नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हफ्त्याला मंजुरी दिली आहे. खरंतर या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात झाली होती. यानंतर या योजनेसाठी 4,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, अद्यापपर्यंत या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता.
यामुळे या योजनेचा पहिला हप्ता केव्हा मिळणार असा सवाल शेतकरी उपस्थित करत होते. अशातच आज या योजनेसाठी राज्य शासनाने 1720 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. याचाच अर्थ या योजनेचा पहिला हप्ता आता काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
परंतु पहिला हप्ता केव्हा मिळणार याबाबत शासनाकडून कोणतीच तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र आगामी सणासुदीचा हंगाम पाहता विजयादशमीच्या पूर्वी शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो असे मत काही तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
निश्चितच जर विजयादशमीच्यापूर्वी हा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला तर सणासुदीच्या दिवसात त्यांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. याव्यतिरिक्त आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लेक लाडकी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता ही योजना संपूर्ण राज्यभर राबवली जाणार आहे. या अंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना आर्थिक सहाय्य पुरवले जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, अकरावीत गेल्यावर 8 हजार रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा रितीने एकूण एक लाख एक हजार रुपयाचा लाभ सरकारकडून दिला जाणार आहे. माझी कन्या भाग्यश्री या योजनेऐवजी लेक लाडकी योजना राबवली जाणार आहे.
कोणत्या मुलींना मिळणार लाभ ?
1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींनाच या योजनेचा लाभ मिळेल. राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.