Maharashtra Government Scheme : महिला सक्षमीकरणासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. केंद्र शासन आणि राज्य शासन महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा हेतू साध्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय.
दरम्यान महिला सक्षमीकरणाचा वसा घेऊन महाराष्ट्रातील एका सरपंचाने आपल्या गावातील लाडक्या बहिणींसाठी अशीच एक कौतुकास्पद योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत लग्नाच्या दिवशी गावातील नवरीला सोन्याची अंगठी, भांडे इत्यादी वस्तू भेट म्हणून दिल्या जाणार आहेत. या योजनेला सरपंच लाडली बहीण योजना असे नाव देण्यात आले आहे.
परभणी येथील कौडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उद्धव नागरे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाशिवरात्रीपासून ही योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
यामुळे सध्या या सरपंचाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. दरम्यान, आता आपण सरपंच नागरे यांनी सुरू केलेल्या या सरपंच लाडली बहना योजनेची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कशी आहे योजना
ग्रामस्थांनी नागरे यांना बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आणले असल्याने नागरे यांनी ही योजना सुरू केली आहे. या योजनेची सुरुवात शुक्रवारपासून झाली आहे.
या योजनेचे उद्घाटन ग्रामस्थांच्या हस्ते झाले असून या अंतर्गत गावातील मुलीच्या लग्नात अन्नदान, भांडे किंवा सोन्याची अंगठी यापैकी एक गाेष्ट मोफत दिली जाणार आहे.ही योजना फक्त कौडगावातील ग्रामस्थांसाठी सुरू झालेली आहे.
या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या योजनेचा संपूर्ण खर्च सरपंच उद्धव नागरे स्वतः करणार आहेत. दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी टीसी, आधारकार्ड, लग्नपत्रिका व दोन फोटो या कागदपत्रांची आवश्यकता राहणार अशी माहिती ग्रामपंचायतकडून प्राप्त झाली आहे.
या याेजनेमुळे वधूपित्यास मोठा हातभार लागणार असा आशावाद देखील या ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. निश्चितच ही एक कौतुकास्पद योजना असून अशा योजना महाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायतीत सुरू झाल्या तर वधूपित्याला मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.
दरम्यान कौडगाव येथील सरपंचाने सुरू केलेल्या या सरपंच लाडली बहना योजनेमुळे त्यांच्यावर चहू बाजूने कौतुकांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.