Maharashtra Havaman Andaj 2023 : महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. खरतर दहा तारखेपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गणरायाच्या आगमनासोबतच राज्यात पावसाला सुरुवात झाली.
गणरायाचे आगमन झाले त्या दिवशी जरूर कमी पाऊस पडला मात्र त्यानंतर रोजच पावसाचा जोर वाढत आहे. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या अशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट दिले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. नागपूरमध्ये तर ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे.
शुक्रवारी आणि शनिवारी नागपूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली आहे. त्यामुळे शहरातील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशातच हवामान खात्याने राज्यात आज पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात सर्व दूर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आज देखील नागपूर विभागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या हवामान प्रणालीमुळे सध्या राज्यात जोरदार पाऊस पडत आहे.
ही परिस्थिती राज्यात जोरदार पावसासाठी पोषक ठरत आहे. विशेष म्हणजे या हवामान प्रणालीमुळे बुधवारपर्यंत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. 27 सप्टेंबरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आज नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून रत्नागिरी वगळता सर्वत्र यलो अलर्ट देण्यात आला आहे.