Maharashtra Highway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या महामार्गांची कामे हाती घेण्यात आहेत. यातील काही महामार्गाची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. विदर्भातील नागपूर ते मुंबई दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे.
हा महामार्ग येत्या नवीन वर्षात सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे सुरू होणार आहे. सध्या या मार्गाचे नागपूर ते भरविर पर्यंतचे सहाशे किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 101 किलोमीटरचे काम येत्या नवीन वर्षात पूर्ण होणार आहे.
यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास सुसाट होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. एकीकडे सातशे किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण झाले आहे तर दुसरीकडे राज्यात असेही काही राष्ट्रीय महामार्ग आहेत ज्यांची दुरावस्था झालेली असतानाही त्यांची कामे अजूनही सुरू झालेली नाहीत.
यामध्ये लातूर ते टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गाचा देखील समावेश होतो. मात्र आता या मार्गाचे काम लवकरच सुरू होईल अशी आशा आहे. कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
या मार्गासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मार्गाच्या कामाच्या आढाव्यासाठी मंगळवारी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.
मंगळवारी अर्थातच दोन जानेवारी 2024 रोजी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत या महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील बोलावण्यात आले आहे.
त्यामुळे लातूर ते टेंभुर्णी हा राष्ट्रीय महामार्ग लवकरच चार पदरी होणार असा आशावाद व्यक्त होत आहे. खरे तर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमधील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे.
काही राष्ट्रीय महामार्गांवर वाहनांची संख्या खूपच कमी आहे तरीदेखील त्यांचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. मात्र लातूर ते टेंभुर्णी या मार्गावर दररोज 14 हजाराच्या आसपास वाहने धावत आहेत.
पण तरीही या मार्गाचे चौपदरीकरण होत नाहीये. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या चौपदरीकरणाला मान्यता दिली होती. मात्र त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने साधा डीपीआर सुद्धा तयार केला नाही.
दरम्यान गेल्या तीन महिन्यांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महामार्ग चौपदरीकरण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात येत्या दोन तारखेला महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे या मार्गाचे लवकरच चौपदरीकरण होईल अशी आशा पल्लवीत झाली आहे.