Maharashtra Latest Havaman Andaj : महाराष्ट्रात गेली तीन वर्ष समाधानकारक पाऊस झाला. हवामान तज्ज्ञांच्या मते ला निनाच्या पार्श्वभूमीवर गेली तीन वर्ष मराठवाड्यात देखील चांगला पाऊस नोंदवला गेला आहे. पण यंदा मात्र मान्सूनचा लहरीपणा अगदी सुरुवातीपासून बघायला मिळत आहे.
एलनिनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कमी पाऊस पडत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत एल निनो सुप्त अवस्थेत होता. आयओडी म्हणजेच इंडियन ओशियन डायपोल देखील तटस्थ अवस्थेत होता. तरीही ऑगस्ट महिन्यापर्यंत संपूर्ण देशभरात सरासरी पेक्षा आठ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार एक जून पासून ते 27 ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण देशभरात आठ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. खरंतर यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाले. एक जूनला केरळात येणारा मान्सून यंदा आठ जूनला आला. महाराष्ट्रात सात जून ला येणारा मान्सून यंदा 11 जूनला आला.
मात्र महाराष्ट्रात मान्सून आल्यानंतर तो कोकणातच बरेच दिवस रेंगाळला. कोकणात जवळपास 18 जून पर्यंत मान्सून राहिला आणि तेथून पुढे त्याची प्रगती होण्यास सुरू झाली आणि 22 जून पर्यंत मान्सूनने सर्व महाराष्ट्र व्यापला. राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जुलैमध्ये मात्र जोरदार पाऊस झाला आणि जून महिन्यातील पावसाची तूट भरून काढली.
यामुळे शेतकऱ्यांना यंदा चांगला पाऊस होणार अशी आशा देखील होती. परंतु झाले सर्व उलटे, ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. गेल्या सहा ते सात दशकांच्या काळात ऑगस्ट महिन्यात आत्तापर्यंत एवढा मोठा खंड पडलेला नव्हता असं म्हटलं तरी चालेल.
म्हणजेच आपल्यापैकी अनेकांना आठवतही नसेल तेव्हा एवढा मोठा पावसाचा खंड पडला होता. यामुळे आता जोरदार पावसाची वाट पाहिली जात आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने पावसासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. जेष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा 56% कमी पाऊस पडला आहे.
महाराष्ट्रासहीतच दक्षिणेतील इतरही राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे आणि हेच कारण आहे की देशाचे आत्तापर्यंतचे एकूण पर्जन्यमान 8% कमी झाले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यात अपुऱ्या पावसाची नोंद झाली आहे.
विशेष म्हणजे आता पुढील आठ ते दहा दिवस महाराष्ट्रात मोठा पाऊस पडणार नाही असे कृष्णानंदजी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यानंतरचे हवामान कसे राहील सप्टेंबर मध्ये पाऊस पडणार की नाही याबाबतचा सविस्तर हवामान अंदाज भारतीय हवामान विभाग 31 ऑगस्टला जारी करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या जिल्ह्यात पडलाय कमी पाऊस
हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यात मध्य महाराष्ट्रमधील नंदुरबार, धुळे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाडामधील धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, विदर्भमधील बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यामध्ये 20% पासून ते 59% कमी पावसाची नोंद झाली आहे.
निश्चितच या संबंधित जिल्ह्यांमधील परिस्थिती खूपच बिकट असून आता सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला नाही तर ही परिस्थिती हाताबाहेर निघू शकते. दरम्यान सुप्त अवस्थेत एल निनोची तीव्रता आगामी काही दिवसात वाढणार असल्याचा अंदाज काही हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. साहजिकच यामुळे सप्टेंबर महिन्यात कसा पाऊस पडतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.