Maharashtra New Expressway : नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्यात. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीच्या अनेक खासदारांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये काही मंत्र्यांचा देखील समावेश होता हे विशेष. दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला असल्याने आगामी विधानसभेसाठी महायुतीने आता सावध भूमिका घेतली आहे.
सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी महायुती सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही गटांमध्ये जागावाटपावरून आत्तापासूनच खलबत सुरू झाले आहे.
महायुती सरकार सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकांआधीच महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची कामे पूर्ण करून त्यांचे लोकार्पण करण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा शेवटच्या टप्प्याचे देखील विधानसभा निवडणुकी आधी लोकार्पण व्हावे यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लवकरच लोकार्पण होणार असे संकेत दिले आहेत. खरे तर, मुंबई ते नागपूर दरम्यान 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग विकसित केला जात आहे. आतापर्यंत या महामार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.
नागपूर ते इगतपुरी या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक सुरु आहे. सुरुवातीला या महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला. डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले.
यानंतर शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला. मग भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा तपास सुरू झाला. आता शेवटचा टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.
खरे तर या प्रकल्प अंतर्गत शहापूर येथे दोन पूल तयार करण्यात आले आहेत. यातील एका पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु दुसऱ्या पुलाच्या कामांसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
त्यामुळे आता राज्य रस्ते विकास महामंडळाने यातील एक पुल खुला करून या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. शहापूर येथील एका पुलाचे ऑगस्ट अखेरपर्यंत काम होणार असून यानंतर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
संपूर्ण समृद्धी महामार्ग खुला झाल्यानंतर मुंबई ते नागपूर पर्यंतचा प्रवास अवघ्या आठ तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. याशिवाय मुंबई ते शिर्डीचा प्रवास देखील वेगवान होणार आहे.
सध्या मुंबई ते शिर्डी हा प्रवास करण्यासाठीच सात तासांचा कालावधी लागतोय. मात्र जेव्हा हा शेवटचा टप्पा सुरू होईल तेव्हा मुंबई ते शिर्डी हा प्रवास अवघ्या 3-4 तासांच्या कालावधीत पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.