Maharashtra New Expressway : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरंतर, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये राजधानी मुंबईमधील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकसंख्येचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील सद्यस्थितीला असलेली वाहतूक व्यवस्था तोकडी ठरत असल्याचे चित्र आहे.
यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उड्डाणपूल, भुयारी मार्ग, कोस्टल रोड तयार केले जात आहेत. शहरातील नागरिकांचा प्रवास जलद आणि सुरक्षित व्हावा यासाठी मेट्रोची देखील जोड दिली जात आहे. विविध मार्गांवर मेट्रो सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय इतरही अन्य रस्ते विकासाची कामे शासनाकडून हाती घेण्यात आली आहेत.
अशातच आता आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर भारताला थेट मुंबईशी जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून एका महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार आहे. NHI कडून मुंबई एक्सप्रेसवे आणि हरियाणातून जाणारा ट्रान्स हरियाणा एक्सप्रेस वे परस्परांना जोडला जाणार आहे.
यासाठी 1400 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्या 86.5 किमी लांबीच्या ग्रीनफिल्ड लिंक एक्स्प्रेस वेद्वारे 152D मुंबई एक्स्प्रेस वेशी जोडला जाईल अशी माहिती समोर आली आहे. यामुळे राजधानी मुंबईला आणि संपूर्ण महाराष्ट्राला फायदा मिळणार असून यामुळे महाराष्ट्राचा एकात्मिक विकास सुनिश्चित होणार आहे.
हरियाणा-राजस्थान सीमेवरील पणियाला येथून सुरू होणारा हा ग्रीन फील्ड ऍक्सेस कंट्रोल एक्स्प्रेस वे अलवरमधील मुंबई एक्स्प्रेस वेशी जोडला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, या द्रुतगती मार्गासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे टार्गेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डोळ्यासमोर ठेवले आहे.
या एक्स्प्रेस वेच्या निर्मितीनंतर जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल, चंदीगड, उत्तराखंड येथून येणारी वाहने 152D वरुन थेट मुंबई एक्स्प्रेस वे वर चढणार आहेत. यामुळे मुंबईसह महाराष्ट्राची उत्तर भारतासोबत कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचा उत्तर भारताकडील प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे.
सध्या, कुरुक्षेत्र ते इस्माईलाबाद पर्यंत सुरू होणाऱ्या 227 किमी लांबीच्या ट्रान्स हरियाणा एक्सप्रेसवेवरून, वाहने 148B वर नारनौल मार्गे जातात आणि त्यांना जयपूर, अजमेर मार्गे पणियाला, कोटपुतली मार्गे मुंबईला जावे लागते, पण हा एक लांबचा मार्ग आहे. नवा मार्ग पणियाला येथून सुरू होईल आणि अलवरमधील बडोदामेव जवळ मुंबई एक्सप्रेसवेशी जोडला जाईल.
यामुळे केवळ अंतर कमी होणार नाही तर उत्तर भारत आणि मुंबईदरम्यानचा प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. हा मार्ग पूर्ण झाला की हरियाणाच्या दिशेकडील अनेक जिल्हे थेट दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाशी जोडले जातील. याशिवाय चंदीगड ते जयपूर प्रवासाचे अंतरही कमी होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक मुकेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रस्तावित नवीन मार्ग 86.5 किमी लांबीचा राहणार आहे. तसेच या नवीन ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेचे काम फक्त दोन वर्षांत पूर्ण होईल आणि लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.