Maharashtra New Expressway : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. असाच एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे राजधानी मुंबई ते राष्ट्रीय राजधानी दिल्ली या दरम्यानचा महामार्ग. हा महामार्ग प्रकल्प भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे.
या अंतर्गत तब्बल 1350 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग विकसित होत आहे. यामुळे मुंबई ते दिल्लीचा प्रवास हा वेगवान होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या मुंबई ते दिल्ली हा प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना तब्बल 24 तासांचा कालावधी लागतो.
मात्र जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हा प्रवास कालावधी अवघ्या 12 तासांवर येणार आहे. यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे तसेच इंधनाच्या खर्चात देखील मोठी बचत होणार आहे. यामुळे प्रदूषणावर देखील मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार आहे.
दिल्ली ते उरणचे जेएनपीटी बंदर यादरम्यान हा 1350 किलोमीटर लांबीचा महामार्ग विकसित होणार आहे. या प्रकल्प अंतर्गत माथेरानच्या डोंगरांमध्ये बोगदा तयार केला जाणार आहे. 4.39 किलोमीटर लांबीचा आठ लेनचा हा टनेल राहणार आहे.
हा बोगदा पनवेलजवळ माथेरानच्या पायथ्याशी मोरबे ते ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथनजीकच्या भोज गावापर्यंत राहणार आहे. हा बोगदा तयार करण्यासाठी तब्बल 1453 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. मुंबई-दिल्ली महामार्ग हा एक आठ पदरी ग्रीनफिल्ड महामार्ग आहे.
या महामार्ग प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे दोन भाग वाहतुकीसाठी सुरू झाले असून उर्वरित प्रकल्पाचे काम देखील जलद गतीने सुरू आहे.
दरम्यान या प्रकल्पाअंतर्गत माथेरानच्या डोंगरांमध्ये तयार होणारा बोगदा 2025 अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या पंधरा मिनिटात पूर्ण होणार आहे.
या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास गतिमान होणार आहे. यामुळे राज्याच्या शिक्षण, उद्योग, पर्यटन, कृषी, राजकारण, समाजकारण, अध्यात्मिक अशा विविध क्षेत्राला नवीन दिशा मिळणार आहे.
हा महामार्ग फक्त दोन शहरांना जोडेल असे नाही तर दोन राजधान्या जोडण्याचे काम करणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण देशाचा एकात्मिक विकास सुनिश्चित होणार आहे.