Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे राज्यात अजूनही अनेक महामार्गाची कामे सुरू आहेत. समृद्धी महामार्गाचे काम देखील प्रगतीपथावर आहे. समृद्धी महामार्ग अंतर्गत मुंबई ते नागपूर दरम्यान नवीन मार्ग विकसित केला जात आहे.
या महामार्गाला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग राहणार आहे. आतापर्यंत या मार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून त्यावर वाहतूक सुरू झाली आहे.
आतापर्यंत समृद्धी महामार्गाचे नागपूर ते इगतपुरी एवढे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे बाकी राहिलेला इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा देखील लवकरच वाहतुकीसाठी सुरू होणार असा दावा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरी ते आमने हा टप्पा जुलै 2024 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. दरम्यान हा संपूर्ण महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हा प्रवास वेगवान होणार आहे. अशातच आता समृद्धी महामार्ग संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
ते म्हणजे समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाणार असून जालना ते नांदेड दरम्यान नवीन महामार्ग तयार होणार आहे. हा महामार्ग प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार आहे. दरम्यान याच प्रवेश नियंत्रित महामार्ग संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी १० स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांनी २३ निविदा सादर केल्या आहेत. १७९.८५ किमी लांबीच्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचे उत्तरी टर्मिनल ७०१ किमी लांबीच्या मुंबई-नागपूर द्रुतगती मार्गावर (समृद्धी महामार्ग) असेल.
हे दोन्ही प्रकल्प जोडले जाणार असल्याने नांदेड ते मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ ११ तासांवरून ६ तासांपर्यंत कमी होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी निविदा सादर झाल्या असून सध्या याची छाननी सुरू आहे.
छाननी पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाचे वर्क ऑर्डर काढले जाणार असे बोलले जात आहे. मात्र निविदा नंतरची पुढील कारवाई ही निवडणुका संपन्न झाल्यानंतरच होणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला अन नवीन सरकार स्थापित झाले की मग या महामार्ग प्रकल्पासाठीची पुढील कारवाई सुरू होईल असा दावा केला जात आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते नांदेड हा प्रवास सहा तासांवर येणार आहे. प्रवाशांचे तब्बल पाच तास वाचणार आहेत.
यामुळे मराठवाड्यातील जनतेला जलद गतीने मुंबईत पोहोचता येणे शक्य होणार असून या निमित्ताने मराठवाड्याचा एकात्मिक विकास सुनिश्चित होऊ शकतो असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे. मराठवाड्यातील कृषी, उद्योग, शिक्षण, अध्यात्म पर्यटन अशा विविध क्षेत्राला या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे.