Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात अनेक रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. राज्यात समृद्धी महामार्गासारखे हायटेक एक्सप्रेस वे देखील तयार होत आहेत. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा असून हा महामार्ग सध्या स्थितीला राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे.
सध्या याचे काम सुरू असून आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. उर्वरित 76 किलोमीटर लांबीचे काम देखील युद्धपातळीवर सुरु असून जुलै 2024 मध्ये संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी सुरू होणार अशी आशा आहे.
एवढेच नाही तर आता राज्यात समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांबीचा महामार्ग विकसित होणार आहे. हा महामार्ग विकसित झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आता नागपूर ते गोवा दरम्यान नवीन शक्तीपीठ महामार्ग विकसित होणार आहे.
या महामार्गाला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. तसेच या महामार्गाची अधिसूचना देखील निर्गमित झाली आहे. एवढेच नाही तर या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. हा महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे.
कसा राहणार रूट ?
शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पांतर्गत वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील दिगरज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी जवळील बांदा पर्यंत 805 किलोमीटर लांबीचा महामार्ग तयार होणार आहे. 12 जिल्हयातील 12 हजार 589 इतक्या गट नंबरमधील 27 हजार 500 एकरातून हा महामार्ग जाणार आहे.
या महामार्ग प्रकल्पाअंतर्गत 26 ठिकाणी इंटरचेंज, 28 मोठे पूल, 30 बोगदे आणि आठ रेल्वे क्रॉसिंग विकसित केले जाणार आहेत. हा महामार्ग तयार करण्यासाठी 86 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या महामार्गाचे भूसंपादन सुरू झाले असून भूसंपादनाची ही प्रक्रिया या संपूर्ण वर्षात पूर्ण होईल अशी आहे.
केव्हा सुरू होणार काम
या मार्गाचे काम भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुरू होणार आहे. याचे भूमिपूजन 2025 मध्ये केले जाईल आणि 2030 पर्यंत हा संपूर्ण महामार्ग बांधून तयार होणार आहे. अर्थातच 2030 अखेरपर्यंत शक्तिपीठ महामार्गाने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे.
18 तासाचा प्रवास आठ तासावर
सध्या स्थितीला नागपूर ते गोवा हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जवळपास 18 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय. परंतु जेव्हा शक्तिपीठ महामार्ग रेडी होईल आणि यावर वाहतूक सुरु होईल तेव्हा हा प्रवास फक्त आठ तासात पूर्ण होईल असे बोलले जात आहे. म्हणजे नागपूर ते गोवा प्रवास करताना जवळपास दहा तासांचा कालावधी या महामार्गामुळे वाचणार आहे.
कोणत्या जिल्ह्यातुन जाणार ?
शक्तिपीठ महामार्ग राज्यातील श्रीक्षेत्र सप्तशृंगी देवी मंदिर हे शक्तिपीठ वगळता उर्वरित तीन शक्तिपीठांना परस्परांना जोडणार आहे. यामुळे या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई देवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी अशी तीन शक्तीपीठे हा महामार्ग जोडणार आहे.
यामुळे भाविकांचा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग ही जिल्हे या महामार्गाने जोडली जाणार आहेत. म्हणजेच जे जिल्हे समृद्धी महामार्गाने एकमेकांना कनेक्ट झालेली नाहीत ती जिल्हे हा महामार्ग जोडेल असे चित्र आहे.