Maharashtra New Expressway : समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग आता लवकरच पूर्णपणे खुला होणार आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान तयार होत असलेला हा समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे.
यापैकी नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला. यानंतर शिर्डी ते भरवीर पर्यंतचा 80 किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू झाला.
म्हणजेच आत्तापर्यंत नागपूर ते भरविर हा एकूण 600 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लवकरच या मार्गाचा 101 किलोमीटर लांबीचा टप्पा देखील सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाणार आहे.
एकंदरीत समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशातच महाराष्ट्रात आणखी एक नवीन महामार्गाचे काम सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे.
नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग तयार होणार आहे. या महामार्गाचे अलाइनमेंट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून अंतिम करण्यात आले आहे.
आधी हा मार्ग 760 किलोमीटर लांबीचा राहिल असे सांगितले जात होते. मात्र आता अलाइनमेंट पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग 805 किलोमीटर लांबीचा राहणार अशी माहिती समोर आली आहे.
अर्थात समृद्धी महामार्गपेक्षा या मार्गाची लांबी जवळपास 100 किलोमीटर अधिक राहणार आहे. त्यामुळे नागपूर ते गोवा दरम्यान तयार होत असलेला हा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.
सध्या स्थितीला नागपूर ते गोवा असा प्रवास करण्यासाठी जवळपास 21 तासांचा कालावधी लागतो मात्र या मार्गाची उभारणी झाल्यानंतर हा प्रवास फक्त आणि फक्त 11 तासात पूर्ण होणार आहे.
अर्थातच प्रवासाच्या कालावधीत जवळपास दहा तासांची बचत होणार आहे. हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.
तसेच पुढे हा मार्ग कोकण द्रुतगती महामार्गास गोवा महाराष्ट्र सरहद्दीवर जोडण्यात येणार आहे. यासाठी 86 हजार 300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.