Maharashtra New Expressway : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांपासून रस्ते विकासाच्या कामांनी वेग पकडला आहे. गेल्या 10 वर्षाच्या काळात भारतात अनेक मोठमोठ्या महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे भारतातील कनेक्टिव्हिटी चांगली मजबूत झाली असून याचा नागरिकांना मोठा फायदा होत आहे. यामुळे कृषी, पर्यटन, अध्यात्म, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्राला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या फायदा मिळत आहे.
मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून काही महामार्गांची कामे रखडली आहेत. असाच एक मार्ग म्हणजे मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग. दरम्यान याच राष्ट्रीय महामार्ग संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम अगदी युद्धपातळीवर सुरू आहे.
हेच कारण आहे की, 11 जुलै ते 13 जुलैपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोलाडजवळील पुई मसदरा येथे पुलाचे गर्डर बसविण्याचे काम सुरू असल्याने राष्ट्रीय महामार्ग बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, हा महामार्ग 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत बंद राहणार आहे. यासोबतच, मुंबई-गोवा दरम्यान प्रवास करण्यासाठी स्वतंत्र मार्ग सुद्धा निश्चित करण्यात आला आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करताना प्रवाशांना या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे.
यामुळे काही काळ प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत, आता आपण पर्यायी मार्गांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे असतील पर्यायी मार्ग ?
मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी प्रवाशांसाठी पहिला मार्ग वाकण फाटा, भिसे खिंड, रोहा कोलाड दरम्यान निश्चित करण्यात आला आहे.
मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी अन्य पर्यायी मार्ग वाकण फाटा, पाली, रावळजे निजामपूर माणगाव असा राहणार आहे.
खोपोली पाली वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ अ वरून येणाऱ्या प्रवाशांना पाली येथून मुंबई-गोवा महामार्गावर जाता येईल.
गोव्याहून मुंबईला प्रवासी येत असल्यास त्याला कोलाड, रोहा, भिसे पास वाकण फाटा किंवा नागाठाणे मार्गे मुंबई गोवा महामार्गाने जावे लागणार आहे.
गोव्यातून मुंबईला जाण्यासाठी दुसरा पर्यायी मार्गही ठरवण्यात आला आहे. खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548A मार्गे कोलाड, रवळजे, पाली मार्गे प्रवासी मुंबईत येऊ शकतात. त्याचबरोबर गोव्याहून मुंबईकडे जाणारा तिसरा मार्ग कोलाड, रावळजे पाली-वाकण फाटा दरम्यान निश्चित करण्यात आला आहे.