Maharashtra New Ring Road Project : महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचा विस्तार गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या तिन्ही शहरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकासकामांची प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत.
यामुळे या सुवर्ण त्रिकोणाचा संपूर्ण चेहरा-मोहरा बदलला आहे. अशातच आता नासिक जिल्ह्याबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात एक नवीन रिंग रोड तयार केला जाणार आहे.
विशेष म्हणजे यासाठी भूसंपादनाचे कार्य देखील सुरू करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
कुठे तयार होणार नवीन रिंग रोड
नासिक जिल्ह्यातील सिन्नर शहराजवळील माळेगाव व मुसळगाव या दोन औद्योगिक वसाहतींना जोडण्यासाठी नवीन रिंग रोडची उभारणी केली जाणार आहे.
हा नवीन सात किलोमीटर लांबीचा आउटर रिंग रोड म्हणजेच बाह्य वळण रस्ता या परिसरातील नागरिकांना मोठा फायदेशीर ठरणार असून यामुळे माळेगाव एमआयडीसी मधून मुसळगाव एमआयडीसी मध्ये जाणे सोयीचे होणार आहे.
यामुळे सिन्नर शहरात होणारी वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येईल असा आशावाद व्यक्त होत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सिन्नर शहरासाठी आधी देखील एक रिंग रोड तयार करण्यात आला आहे.
खरे तर, सिन्नर शहरातून हायवे जातो. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. म्हणून गुर्हेवारी ते शिर्डीरोडपर्यंत बाह्यवळण रस्ता तयार झाला आहे.
मात्र शहराच्या उत्तरेकडून येणारी वाहतूक आजही शहरातून जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या पूर्णपणे नष्ट झालेली नाही. हेच कारण आहे की, आता शहराला दुसरा बाह्यवळण रस्ता मिळणार आहे.
सिन्नर शहराजवळील माळेगाव व मुसळगाव या एमआयडीसीला जोडण्यासाठी हा बाह्य वळण रस्ता तयार होणार असून हा रस्ता नासिक-पुणे हायवेला जोडला जाणार आहे.
यासाठी 31 हेक्टर जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यामुळे शहरातील हा दुसरा रिंग रोड तरी वाहतूक कोंडी फोडेल असा आशावाद व्यक्त होत आहे.