Maharashtra News : गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला होता. मार्च 2023 मध्ये राज्य कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना या आपल्या मुख्य मागणीसाठी हा संप पुकारला होता.
यापूर्वी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या प्रलंबित मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी सहा महिन्यांच्या काळासाठी संप केला होता. एस टी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप गेल्यावर्षी पुकारला होता.
दरम्यान, या दोन्ही संपाचा सामान्य जनतेला मोठा फटका बसला होता. नुकताच पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच पीएमपीएल मधील कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला. दरम्यान पीएमपीएल मधील कर्मचाऱ्यांच्या या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
पी एम पी एल ही अत्यावश्यक सेवेमध्ये येते यामुळे यापुढे सामान्य नागरिकांना वेठीस धरून सदर प्राधिकरणामधील कर्मचाऱ्यांना संप पुकारता येणार नाही असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे आता यापुढे या संबंधित कर्मचाऱ्यांनी जर संप पुकारला तर त्यांना नोकरी गमवावी लागू शकते.
याबाबतची अधिसूचना राज्य शासनाच्या माध्यमातून नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे. पी एम पी एल मधील कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. पुणेकरांचा शहरातील प्रवास यामुळे आव्हानात्मक बनला होता.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, 2023 चे कलम 2 चा खंड (क) चा उपखंड (एक) व (पाच) यासह कलम 4 चे पोट-कलम (1) मधील तरतुदीच्या अधीन राहून महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाद्वारे आता यापुढे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सेवेतील कर्मचाऱ्यांना संप पुकारता येणार नाही. दि. 26 ऑगस्ट 2023 पासून या संबंधित कर्मचाऱ्यांना संप करण्यास मनाई करण्यात येत असून त्यांनी जर यापुढे संप पुकारला तर त्यांच्या नोकरीवर देखील गदा येऊ शकते असे सांगितले जात आहे.