Maharashtra News : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात आमदारांचे संख्याबळ वाढणार आहे. खरंतर, महाराष्ट्रात विधानसभा आणि विधानपरिषद असे दोन विधिमंडळ आहेत. यापैकी विधानसभा या विधिमंडळात दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून नियुक्त उमेदवारांना स्थान दिले जाते.
दरम्यान याच विधानसभेतील आमदारांची संख्या वाढवण्याबाबत वर्तमान सरकारकडून चाचपणी सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील आमदारांची संख्या वाढेल असे संकेत दिले आहेत. वास्तविक सध्या स्थितीला महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा आमदार आहेत.
मात्र आता ही संख्या 72 पर्यंत वाढणार आहे. म्हणजेच राज्यात आणखी 72 आमदार वाढतील आणि ही संख्या 360 वर जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026 मध्ये महाराष्ट्रातील आमदारांची संख्या 360 पर्यंत जाऊ शकते असे संकेत दिले आहेत. यासाठी राज्याला नवीन विधान भवन मिळणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
सध्या विधानसभेत 300 आमदारांना बसण्यासाठी जागा आहे, यामुळे आता नवीन विधान भवन तयार केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील संकेत दिले आहेत. विधानभवनाची नवीन वास्तू तयार करण्याचे सरकारचे विचाराधीन असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.
मुंबई येथे नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत संकेत दिले होते. याचाच अर्थ आता केंद्राच्या धर्तीवरच महाराष्ट्राला देखील नवीन विधीभवन मिळणार आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नवीन संसद भवन तयार केले आहे. या नवीन संसद भवनाचे उद्घाटन देखील झाले आहे. आता केंद्राप्रमाणेच राज्याला देखील नवीन विधी भवन मिळणार आहे.
हे नवीन विधी भवन सध्याच्या विधी भवनातील पार्किंग मध्येच बनवले जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. विशेष बाब अशी की, महाराष्ट्रातील नवीन विधान भवनासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच एक प्रस्ताव तयार करणार आहेत आणि हा प्रस्ताव वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहेत असा मोठा दावा एका मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. एकूणच काय की महाराष्ट्रात आता आमदारांची संख्या वाढणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात नवीन विधान भवन देखील विकसित केले जाणार आहे.