Maharashtra Railway News : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली होती. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली. यानंतर आपल्याला देशातील अन्य महत्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सध्या स्थितीला ही गाडी देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. विशेष म्हणजे यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते जालना, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.विशेष म्हणजे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे, लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरला नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. ही ट्रेन मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर सुरू होणार अशी शक्यता आहे.
याशिवाय मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते बडोदा, मुंबई ते छत्रपती संभाजी नगर अशा विविध मार्गांवर ही गाडी सुरू होणार असा दावा केला जात आहे. अशातच, आता पुणे ते नाशिक दरम्यान विकसित होणाऱ्या रेल्वे कॉरिडोरवर देखील ही गाडी सुरू होणार अशी माहिती समोर येत आहे.
खरंतर पुणे ते नाशिक असा सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प विकसित होणार आहे. दरम्यान याच प्रकल्पासंदर्भात नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर महत्त्वाची आढावा बैठक घेतली आहे.
या बैठकीत हा रेल्वे मार्ग व्यवहार्य व्हावा यासाठी सुरुवातीला 24 वंदे भारत ट्रेन आणि दोन इंटरसिटी गाड्या चालवण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवण्यात आले आहे. ही ट्रेन आणि एक्स्प्रेस ताशी 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 16039 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
या कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते नाशिक हा प्रवास वेगवान होणार आहे. विशेष म्हणजे हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर यावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन रेल्वेने आखले आहे.
जर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालू झाली तर निश्चितच पुणे ते नाशिक असा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास वेगवान अन आरामदायी होणार आहे.