Maharashtra Railway News : रेल्वे हे प्रवासाचे एक प्रमुख साधन आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या करोडोच्या घरात आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तर याच प्रवासाला पसंती दाखवली जाते. याचे कारण म्हणजे हा प्रवास खूपच जलद होतो आणि कमी पैशात प्रवास करणे शक्य होते.
सर्वसामान्यांना परवडणारी ही रेल्वे फायदेशीर आहे तेवढाच हा प्रवास गर्दीमुळे अनेकदा कंटाळवाणा देखील वाटतो. रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी पाहता प्रशासनाच्या माध्यमातून सणासुदीच्या दिवसात विशेष गाड्या सोडल्या जातात. अतिरिक्त गाड्या सोडून रेल्वे मार्गावरील गर्दी नियंत्रणात ठेवण्याचा रेल्वेचा प्रयत्न असतो.
विदर्भातील नागपूर ते गोव्यातील मडगाव यादरम्यान देखील अशीच एक विशेष गाडी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. दरम्यान याच गाडीबाबत रेल्वे प्रशासनाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने या गाडीला मुदतवाढ देण्याचे जाहीर केले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार विदर्भातील प्रवाशांचा या गाडीला मिळत असलेला प्रतिसाद पाहता प्रशासनाने या विशेष गाडीला जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आधी ही गाडी 31 मार्च 2024 पर्यंत चालवण्याचा निर्णय झाला होता. मात्र प्रवाशांनी दाखवलेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि आगामी सणासुदीचा काळ या सर्व बाबी विचारात घेऊन या गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे विदर्भातून कोकणात जाणाऱ्यांची सोय होणार आहे. नागपूरसहित संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात येत असतात. अशा परिस्थितीत, या विशेष गाडीचा या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे. यामुळे आता रेल्वेने या विशेष गाडीला जून अखेरपर्यंत म्हणजे मान्सून आगमनापर्यंत मुदतवाढ दिली आहे.
परिणामी या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सणासुदीच्या काळात देखील जलद होईल अशी आशा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरून बुधवारी आणि शनिवारी सोडली जाते. तसेच परतीच्या प्रवासात अर्थातच मडगाव जंक्शन येथून ही गाडी गुरुवारी आणि रविवारी सोडली जाते.
या गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झालेला आहे. वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमळी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबा घेते.