Maharashtra Railway News : वंदे भारत एक्सप्रेस ही अल्पकालावधीत रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरलेली संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत ही गाडी देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे कालच 9 वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील 9 महत्त्वाच्या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन केले आहे. विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात देशातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू केले जाणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही ताशी 160 किलोमीटर एवढ्या कमाल वेगाने धावण्यास सक्षम आहे. मात्र प्रत्यक्षात ही गाडी 100 ते 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे. काही मार्गावर या गाडीचा वेग याहीपेक्षा कमी आहे.
मात्र रुळांचे अपग्रेडेशन पूर्ण झाल्यानंतर 110 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणारी ट्रेन 130 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावेल आणि 100 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणारी ट्रेन ११० किलोमीटर प्रति तास या वेगाने किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने धावू शकेल अशी माहिती जाणकार लोकांच्या माध्यमातून दिली जात आहे.
दरम्यान, देशातील वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांच्या माध्यमातून कसा प्रतिसाद मिळतोय याबाबतची माहिती रेल्वे कडून नुकतीच देण्यात आली आहे. यानुसार आता आपण महाराष्ट्रातून धावणारा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळतोय या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवाशांची सरासरी संख्या किती आहे याबाबत जाणून घेणार आहोत.
जसं की आपणास ठाऊकच आहे की सध्या राज्यातून पाच महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत ट्रेनच्या 10 फेऱ्या सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव आणि नागपूर ते बिलासपूर या मध्य रेल्वेच्या मार्गावर ही गाडी सुरु आहे.
याशिवाय मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या पश्चिम रेल्वेच्या मार्गावर देखील ही गाडी सुरू आहे. राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसच्या 1 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यानची प्रवासी भारमानाची माहिती मध्य रेल्वे कडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 10 वंदे भारतची सप्टेंबरमधील भारमानाची सरासरी 98 टक्के आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर मध्ये सर्वांत कमी प्रवासी संख्या (८२.६९ टक्के) २२२२३ सीएसएमटी-शिर्डी वंदे भारतमध्ये नमूद करण्यात आली आहे. तसेच २२२२६ सोलापूर-सीएसएमटी वंदे भारतचे प्रवासी भारमान १०१.४७ टक्के एवढे राहिले आहे.
२२२२४ शिर्डी-सीएसएमटी वंदे भारतमध्ये ८४.०१ टक्के एवढी प्रवासी संख्या नमूद करण्यात आली आहे. २०८२६ नागपूर-बिलासपूर वंदे भारतमध्ये ९९.१४ टक्के प्रवासी संख्या राहिली आहे.
सर्वात जास्त प्रवासी संख्या २०८२५ बिलासपूर-नागपूर वंदे भारतमध्ये राहिली, या गाडीत १२२.७१ टक्के प्रवासी भारमान होते. तसेच २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारतला आसन क्षमतेच्या ९८.४६ टक्के आणि २२२३० मडगाव-सीएसएमटी वंदे भारतमध्ये ९०.०२ टक्के प्रवासी संख्या होती.