Maharashtra Rain : यावर्षी राज्यात गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. 10 सप्टेंबर पासून गायब झालेला पाऊस 19 सप्टेंबर अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी पुन्हा सक्रिय झाला. तेव्हापासून 22 सप्टेंबर पर्यंत राज्यात हलका ते मध्यम पाऊस होत होता.
22 सप्टेंबर नंतर पावसाचा जोर वाढला आणि काल अर्थातच 28 सप्टेंबर पर्यंत राज्यातील बहुतांशी भागात मुसळधार ते मुसळधार पाऊस झाला आहे. एकंदरीत गणरायाच्या आगमनापासून ते गणपती विसर्जनापर्यंत राज्यात जोरदार पावसाची हजेरी लागली आहे. यामुळे सप्टेंबरच्या सुरवातीला दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान हवामान खात्याने पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाचे अपडेट दिले आहे. ते म्हणजे राजस्थान मधून मान्सूनचा परतीच्या प्रवास सुरू झाला आहे. आपल्या राज्यातून पाच ऑक्टोबर नंतर परतीचा प्रवास चालू होणार आहे. सध्या मात्र राज्यात मोसमी पाऊस सुरू आहे. राज्यातील विविध भागात पावसाची तुफान बॅटिंग होत आहे.
तसेच हवामान खात्याने राज्यात आगामी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्रावर तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे व द्रोनीय रेषेमुळे राज्यात मान्सूनची प्रणाली सक्रिय आहे. याच मान्सून प्रणालीमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार, पाऊस बरसत आहे.
विशेष म्हणजे ही प्रणाली आगामी दोन दिवस राज्यात सक्रिय राहणार आहे. परिणामी महाराष्ट्रात येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर मात्र राज्यातून पावसाचा जोर ओसरणार असल्याचे सांगितले जात आहे. अर्थातच 30 सप्टेंबर पासून राज्यातून पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे दक्षिण मध्य कोकण व लगतच्या परिसरात आगामी काही दिवस पाऊस होणार आहे. कोकणात पुढील चार दिवस पावसाची शक्यता कायम राहणार असा अंदाज आहे. हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी भागात आगामी दोन दिवस मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.