Maharashtra Rain : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे तांडव पाहायला मिळत आहे. या निसर्गाच्या रौद्ररूपामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे.शेतकऱ्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक या अवकाळी पावसामुळे प्रभावित झाले असून शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती यावेळी व्यक्त केली जात आहे.
खरे तर गेल्या दोन ते तीन दिवसात राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील नासिक, खानदेश विभागातील जळगाव तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. इकडे नासिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव या तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे.
याशिवाय विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली आहे तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागली आहे.
अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून अवकाळी पावसाचे हे संकट नेमके केव्हा निवळणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान याच संदर्भात हवामान खात्याने एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. दरम्यान हवामान विभागातील काही तज्ञांनी अवकाळी पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, सध्या मार्गस्थ होत असलेल्या प. झंजावाताबरोबरच गुरुवारी २९ फेब्रुवारीला पुन्हा एक प.झंजावात मार्गस्थ होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्र ते राजस्थानच्या जोधपूर पर्यंत पसरलेल्या समुद्रसपाटीपासून जवळपास १ किमी. उंचीपर्यंतच्या हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीच्या आस यांच्या एकत्रित परिणामातून दोन मार्चपर्यंत महाराष्ट्रासहित संपूर्ण उत्तर भारतात पावसाची शक्यता तयार होत आहे.
मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसाची शक्यता येत्या दोन मार्चपर्यंत कायम राहणार आहे.
या कालावधीत राज्यातील उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची आणि काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.