Maharashtra Rain : महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून दिवसाचे कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत नमूद केले जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात अजूनही अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक घामाघुम होत आहेत. विशेष म्हणजे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
यंदाचा उन्हाळा हा अधिक तीव्र राहणार अशी भीती व्यक्त होत आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी तीव्र उन्हाच्या झळा आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सऱ्या असे भिन्न वातावरण अनुभवायला मिळत आहे.
विशेष बाब अशी की, अवकाळीचे सावट अजूनही काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता पुन्हा एकदा आयएमडीने आगामी काही दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे सावट असेच कायम राहणार असा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आगामी 48 तासात देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो. दिवसा कडक ऊन आणि रात्री अवकाळी पाऊस अशी काहीशी परिस्थिती सध्या देशात अनुभवायला मिळणार असा अंदाज हवामान खात्याचा आहे.
महाराष्ट्रात 16 मार्चपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागातील काही ठिकाणी वादळी पाऊस झाला आहे. विदर्भातील काही भागात तर गारपीट झाल्याची देखील नोंद करण्यात आली आहे.
यामुळे शेतकरी बांधव हे वादळी पावसाचे आणि गारपिटीचे वातावरण केव्हा निवळणार असाच प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान याच संदर्भात आयएमडीने मोठी माहिती दिली आहे.
काय म्हणतय हवामान विभाग
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, देशातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पूर्वोत्तर आणि पूर्व भारतीय राज्यांमध्ये आज अर्थातच 22 मार्च 2024 ला वादळी पावसाची शक्यता आहे.
तसेच देशातील जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज पासून तीन दिवस अर्थातच 24 तारखेपर्यंत हलका पाऊस किंवा बर्फवृष्टी होईल असा अंदाज आहे. उद्या अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस अन हिमवृष्टीचा अंदाज आहे.
पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात काही भागात, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावू शकतो असे यावेळी हवामान खात्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे. दुसरीकडे आपल्या महाराष्ट्राबाबत माहिती देताना हवामान खात्याने आज आणि उद्या महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवली आहे.
शिवाय राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर गोंदिया आणि वाशिम या सहा जिल्ह्यांमध्ये आगामी दोन दिवस पाऊस पडू शकतो असे देखील म्हटले आहे. यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांनी विशेष सावध राहणे आवश्यक राहणार आहे.