Maharashtra Rain : महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे सावट अजूनही पूर्णपणे दूर झालेले नाही. खरे तर राज्यात 9 फेब्रुवारी नंतर हवामानात मोठा बदल झाला. 10 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि 14 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.
या कालावधीत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट सुद्धा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक वाया गेले. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट महाराष्ट्रावर घोंगावत असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांनी अर्थातच 24 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
काय म्हणतय हवामान विभाग
मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाचे सावट पूर्णपणे निवळल्यानंतर सध्या राज्यात आकाश निरभ्र बनले आहे. पण राज्यात जोरदार वारे वाहत आहेत.
दिवसा उन्हाचा चटका वाढलेला असून, कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. आज अर्थातच 22 जानेवारी 2024 ला देखील अशीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
मात्र, तापमानातील चढ-उतार सुरु असतांनाच आता शनिवारपासून विदर्भात पावसाला पोषक वातावरण तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. शनिवारपासून राज्यात अवकाळी पाऊस आला सुरुवात होणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
मात्र हा अवकाळी पाऊस राज्यात सर्व दूर होणार नसून फक्त विदर्भ विभागात पावसाची शक्यता आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांपैकी नऊ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
अवकाळी पाऊस पडण्याचे कारण नेमके काय ?
सध्या उत्तर भारतात जोरदार वारे वाहत आहे. आपल्या महाराष्ट्रातही जोरदार वारे वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, आग्नेय मध्य प्रदेशपासून विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा ते तमिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राचे देशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता तयार होत आहे. याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ विभागात शनिवारपासून पावसाला सुरुवात होणार असे आयएमडीने म्हटले आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.