Maharashtra Rain : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान वाढले आहे. हवामान खात्याने काल राज्यातील काही भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला होता. त्यानुसार अनेक भागांमध्ये कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत नमूद करण्यात आले.
दुसरीकडे आज देखील राज्यातील काही भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे तापमान नवनवीन विक्रम मोडीत आहे तर दुसरीकडे राज्यातील हवामानात बदल झाला असून अनेक भागांना आता पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात वादळी पावसाचा आणि गारपिटीचा इशारा दिलेला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
काही ठिकाणी गारपिट झाल्याची नोंदही करण्यात आली.यामुळे मात्र रब्बी हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे आर्थिक नुकसान झाले आहे.
आधीच नैसर्गिक संकटांमुळे हतबल झालेल्या बळीराजासाठी हा मोठा फटका असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता एप्रिल महिन्यातही अवकाळी साठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर के एस होसाळीकर यांनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वरून दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सात ते दहा एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत काही भागात गारपीट देखील होणार असा अंदाज त्यांनी दिलेला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र , उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांशी जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
या भागात पुढील तीन ते चार दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची आहे. तसेच विदर्भातील काही जिह्यांमध्ये गारपीटीची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. आज संपूर्ण खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
विदर्भातील वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे, येथे काही ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता आहे. उद्या अर्थातच आठ एप्रिलला खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
उद्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये काही भागात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. नऊ एप्रिलला देखील राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.