Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस यामुळे थंडीचा जोर कमी झाला आहे. राज्यात ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसत आहे.
यामुळे बळीराजा अवकाळी पावसाचे संकट निवळण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण केव्हा निवळणार हाच सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
अशातच भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाबाबत अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट दिले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तब्बल नऊ जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता तयार झाली आहे.
मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये जोराचा अवकाळी पाऊस बरचण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर त्या संबंधीत जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
विशेष म्हणजे उर्वरित मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
यामुळे, राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसापासून पिकाचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला जात आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा या पिकांचे, फळ पिकांचे आणि चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
एकतर आधीच खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळालेले नाहीये. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूृदंड सहन करावा लागला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार अवकाळी पाऊस
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. आज 9 जानेवारी 2024 ला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये म्हणजेच धुळे, जळगाव, नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तसेच उर्वरित मध्य महाराष्ट्र अन मराठवाड्यात सुद्धा तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, पुणे, सातारा आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या संबंधित 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.