Maharashtra Samriddhi Mahamarg : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची उभारणी केली जात आहे. हा महामार्ग प्रकल्प दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.
या प्रोजेक्टसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्याच पुढाकाराने हा महामार्ग जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर एवढी आहे. यापैकी 520 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर नागपूर ते शिर्डीचा प्रवास गतिमान झाला आहे. विशेष म्हणजे या महामार्गाचा दुसरा टप्पा हा नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला आहे.
शिर्डी ते भरवीर पर्यंतचा 80 किलोमीटरचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. म्हणजेच आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला आहे. नागपूर ते भरवीर पर्यंत समृद्धी महामार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झाला आहे. तसेच उर्वरित 101 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे.
आगामी काही महिन्यात हे देखील काम पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण केले जात असून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांनी हा महामार्ग 2024 च्या मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार असा दावा केला आहे.
अशातच मात्र या महामार्गावरून आता मोठा वाद निर्माण होत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून या महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी शासनाकडून तसेच प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.
मात्र या सर्व उपाययोजना फोल ठरत असून या मार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या ही वाढतच आहे. यामुळे महाराष्ट्राला समृद्ध करणारा हा समृद्धी महामार्ग जीवघेणा मार्ग सिद्ध होत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभेत या महामार्गाबाबत एक मोठी मागणी केली आहे.
विधानसभेत काँग्रेस नेत्यांनी हा महामार्ग पुढील सहा महिने बंद ठेवून याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि या महामार्गातील सर्व दोष दूर करून मग हा महामार्ग सुरू करावा अशी मागणी केली आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या महामार्गावरून सरकारला वेठीस धरले.
त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी या महामार्गाचे पुन्हा उद्घाटन करता यावे यासाठी घाईघाईने या मार्गाचे काम सुरू असून याच कारणाने हा अपघात घडला अशी टीका देखील यावेळी केली आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी हा महामार्ग शापित ठरला असून हा मार्ग बंद करावा अशी मागणी केली आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी देखील या महामार्गावर होत असलेल्या अपघाताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. देशमुख यांच्या मते अन्य महामार्गावर गर्डर लाँचिंग करत असताना अपघात होत नाही. अगदी समुद्रातील काम करत असतानाही असे अपघात झालेले नाहीत.
मग या समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यानच अपघात कसा झाला ? तसेच महामार्गावर वाहनांचे अपघात कसे होत आहेत याची सखोल चौकशी होणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. निश्चितच समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातामुळे विरोधक चांगलेच आक्रमक बनले असून आता हा मुद्दा येत्या काही अजूनच तापमान असे चित्र आहे.