Maharashtra ST Employee News : शिंदे सरकारने दोन दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार राज्यातील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर चार टक्के एवढा वाढवण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आतापर्यंत एसटी महामंडळातील कार्यरत कर्मचाऱ्यांना 34 टक्के एवढा महागाई भत्ता म्हणजेच डीए दिला जात होता.
यामध्ये शिंदे सरकारने 4% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता महागाई भत्ता 38% एवढा होणार आहे. परंतु राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीला 42 टक्के एवढा महागाई भत्ता मिळत आहे. यामुळे शासनाने यामध्ये आणखी चार टक्के वाढ करावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान महागाई भत्त्यात आणखी चार टक्के वाढ करणे, सातवा वेतन आयोग लागू करणे यासह इतरही अनेक महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की 2021 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण करावे या आपल्या मुख्य मागणीसाठी सहा महिन्यांचा संप पुकारला होता.
त्यावेळी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळ अडचणीत आले होते. राज्य शासन देखील त्यावेळी बॅकफुटवर आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करणे ही मागणी वगळता बहुतांशी मागण्या शासनाने मान्य देखील केल्या होत्या.
परंतु मागण्या मान्य झाल्या असल्या तरी देखील त्या मागण्यांची अंमलबजावणी अद्याप शासनाकडून करण्यात आलेले नाही. यामुळे एसटी महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक बनले आहेत. आता पुन्हा एकदा एसटी महामंडळात कार्यरत असलेल्यांनी संपाचा मोठा इशारा दिला आहे.
मुंबई येथील आझाद मैदानावर 11 सप्टेंबर रोजी संप पुकारणार असे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच जर या संपाची दखल घेतली नाही आणि राज्य शासनाने प्रलंबित मागण्या मान्य केल्या नाहीत तर 13 सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात संप पुकारण्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे.
एकंदरीत एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 42 टक्के महागाई भत्ता मिळावा, मूळ पगारात वाढ करावी तसेच त्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी 11 सप्टेंबरला मुंबई येथील आझाद मैदानात एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संप पुकारणार आहेत.
तसेच या संपाची दखल घेतली नाही तर 13 सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात संप केला जाईल, जिल्हास्तरावर हा संप केला जाईल असा इशारा देखील संघटनेने दिला आहे. खरंतर राज्यात 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. गणेशोत्सवाच्या सणाला एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढते.
अशा स्थितीत जर या कालावधीत संप पुकारला तर याची झळ सर्वसामान्यांना बसणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात या संपामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. यामुळे आता शासन या मुद्द्याकडे कशा पद्धतीने पाहते आणि या प्रलंबित मागण्या मान्य करते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.