Maharashtra Weather News : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. जुलैला सुरुवातीच्या टप्प्यात राज्यात जोरदार पाऊस कोसळला. यानंतर दुसऱ्या आठवड्यात पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतली. यानंतर पुन्हा एकदा राज्यात जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली.
जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढला. कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. आता मात्र राज्यातून पाऊस गायब झाला आहे. राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे आणि कडक सूर्यप्रकाश पडत आहे.
गेली अनेक दिवस राज्यातील बहुतांशी भागात सूर्याचे दर्शनच होत नव्हते. मात्र आता राज्यात लख्ख सूर्यप्रकाश पडत आहे. यामुळे राज्यातील अनेक भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात पाऊस विश्रांती घेणार असा अंदाज वर्तवला आहे. येत्या काही दिवसात राज्यातून पावसाचा जोर कमी होणार आहे. यामुळे ज्या भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती तेथील विस्कळीत जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे.
परिणामी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात जरी सरासरीपेक्षा 17 टक्के अधिक पाऊस झाला असला तरी देखील पावसाचे वितरण खूपच असमान आहे. म्हणजेच काही भागात अधिक पाऊस झाला आहे तर काही भागात खूपच कमी पाऊस झाला आहे. शिवाय आता ऑगस्ट महिन्यात पाऊस विश्रांती घेणार यामुळे ज्या भागात कमी पाऊस झाला आहे तेथील शेती पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
ऑगस्टमध्ये कस राहणार हवामान ?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील घाटमाथा आणि कोकण पट्ट्याच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. विदर्भातही पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्याचे पहिले दोन आठवडे म्हणजेच पहिला पंधरवाडा हा कमी पावसाचा राहणार आहे.
म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस विश्रांती घेणार आहे. कोकण विभागाच्या काही भागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांत मध्यम पर्जन्यमान राहणार आहे. तसेच ठाणे, पालघर, पुणे, सातारा भागातही अशीच परिस्थिती राहणार आहे. मराठवाड्यातही पुढच्या 24 तासांत तुरळक पावसाचा अंदाज आहे. एकंदरीत जुलैमध्ये जोरदार बरसणारा पाऊस आता ऑगस्ट महिन्यात उसंत घेणार असा अंदाज आहे.