Maharashtra Weather : महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यात पावसाची हजेरी लागली. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
काही ठिकाणी तर गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली होती. यामुळे तेथील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मात्र पाऊस विश्रांती घेणार असे बोलले जात होते. पण बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं देशातील दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
आता गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यातील अवकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. आता राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान तर काही ठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे.
राज्यातील कमाल तापमानात आता मोठी घट होऊ लागली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार असा हवामान अंदाज देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आगामी दोन-तीन दिवस राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. राज्यातील कोकण आणि विदर्भ विभागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची तसेच पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन जाणकार लोकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
उर्वरित महाराष्ट्रात मात्र काही ठिकाणी ढगाळ हवामान तर काही ठिकाणी थंडीचा जोर वाढणार आहे. ज्या भागात थंडीचा जोर वाढेल तेथील शेती पिकांना नवीन संजीवनी मिळणार अन पिकांची चांगली जोमदार वाढ होणार आहे.
महाराष्ट्र सोबतच देशातील काही राज्यांमध्ये आगामी काही दिवस पावसाची शक्यता कायम राहणार आहे. IMD ने सांगितल्याप्रमाणे देशातील पश्चिम बंगाल आणि सिक्कीम राज्यात काही ठिकाणी १२ डिसेंबरपासून गारपिट होण्याची शक्यता आहे.
देशातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होईल असा अंदाज देण्यात आला आहे. एकंदरीत भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस राज्यासह देशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली असून काही भागात बर्फवृष्टी देखील होईल असा अंदाज आहे.