Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. अशातच मात्र भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील विदर्भातील 11 आणि मराठवाड्यातील चार अशा पंधरा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट देखील होण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना मोठा फटका बसेल असा अंदाज आहे.
केव्हा सुरू होणार अवकाळी पाऊस
हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या 3 दिवसांच्या कालावधीत विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे.
विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली चार जिल्ह्यांमध्ये या कालावधीत ढगाळ वातावरणाची आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे.
विशेष म्हणजे विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यात किरकोळ ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रातील उर्वरित 21 जिल्ह्यांमध्ये कुठंच अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण किंवा गारपीट होणार नाही असे खुळे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
अवकाळी पावसाचे कारण काय ?
हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी फेब्रुवारीअखेर हिवाळी हंगाम संपून पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरु होत असतो. याला संक्रमणाचा काळ सुद्धा म्हणतात. विशेष म्हणजे या संक्रमणाच्या काळात दरवर्षी पूर्वमौसमी पाऊस पडत असतो.
या पूर्वमोसमी हंगामात पूर्व मध्य प्रदेश ते तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पूर्व किनारपट्टी समांतर वक्रकार हवेच्या कमी दाबाचा आस किंवा वारा खंडितता प्रणाली तयार होत असते. ह्या आस किंवा पट्ट्याच्या पश्चिमेला उत्तेकडून तर पूर्वेला दक्षिणेकडून आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या मिलनातून गडगडाटीसह वीजा, गारांचा पाऊस कोसळत असतो, असे यावेळी तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान सध्या अशीच वातावरणीय परिस्थिती तयार झाली असून राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील 15 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची आणि काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.