Maharashtra Weather Update : भारतीय हवामान खात्याने गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत देशातील विविध भागांमधून मान्सूनने काढता पाय घेतला आहे.
आपल्या राज्याचा विचार केला असता महाराष्ट्रातुनही विविध भागातून मान्सून परतला आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, मराठवाडा आणि विदर्भ मध्य महाराष्ट्रातील काही भागातून मान्सून परतला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. यामुळे मात्र राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे.
वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः बेजार झाले आहेत. यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. खरंतर ऑक्टोबर हा महिना संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात ऑक्टोबर हिटमुळे वातावरणात मोठा उकाडा तयार होतो. यावर्षी मात्र ऑक्टोबर हिटची झळ अधिक जाणवत आहे.
अशातच काल-परवा राज्यातील काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने देखील हजेरी लावली आहे. यामुळे थोड्या काळासाठी ज्या ठिकाणी पाऊस झाला तिथे गारवा निर्माण झाला होता. पण आता पुन्हा एकदा राज्यात सर्वत्र उकाड्यामध्ये मोठी वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे दिवसा तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर रात्री थंडी पडत आहे. यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात हिवाळ्याला सुरवात होणार आणि थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता अरबी समुद्रात 21 ऑक्टोबर च्या सुमारास एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता हवामाना विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रात तेज नावाचे चक्रीवादळ तयार होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे याचा परिणाम राजधानी मुंबई आणि कोकणात पहावयास मिळणार आहे. या चक्रीवादळामुळे देशातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दरम्यान मुंबईसह कोकण किनारपट्टीत तापमान 33 अंश सेल्सिअस पर्यंत आणि विदर्भ तसेच मध्ये महाराष्ट्रातील काही भागात तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहचणार असे देखील हवामान खात्याच्या माध्यमातून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
एकंदरीत अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे काही भागात पावसाची शक्यता तयार होत आहे तर काही ठिकाणी तापमानात अशीच वाढ कायम राहणार आहे. त्यामुळे राज्यात समिश्र वातावरण अनुभवायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.