Maharashtra Weather Update : महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमध्ये सातत्याने वातावरणात बदल होत आहे. गेल्यावर्षी मान्सून काळात एलनिनोच्या प्रभावामुळे खूपच कमी पाऊस बरसला. राज्यात सरासरीपेक्षा 12 टक्के कमी पावसाची नोंद झाली.
याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात मोठी घट आली. यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागली. यामुळे रब्बी हंगामातील अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या पिकांवर विपरीत परिणाम झाला.
अनेक भागात हरभरा पिकाची दुबार पेरणी करावी लागली. म्हणजेच खरीप हंगामात कमी पावसामुळे आणि आता रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली आहे.
गेल्या आठवड्यात राज्याचे देशातील अनेक भागात पावसाची हजेरी लागली. एकीकडे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तीव्र थंडीची लाट आली होती तर दुसरीकडे देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची बरसात सुरू होती.
एकंदरीत देशात विरोधाभासी वातावरण पाहायला मिळाले. महाराष्ट्रात देखील विरोधाभासी वातावरण होते. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी थंडीची तीव्रता पाहायला मिळाली.
पण गेल्या आठवड्यातील राज्यातील हे विरोधाभासी वातावरण आता पूर्णपणे निवळले आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून आता अवकाळी पावसाचे सत्र पूर्णपणे थांबलेले असून हळूहळू आता राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे.
हवामान खात्याने राज्यातील किमान तापमानात घट होईल आणि राज्यात थंडीचा जोर वाढेल असे म्हटले आहे. महाराष्ट्रात सह देशाच्या उत्तरेकडे राज्यांमध्ये देखील थंडीची तीव्रता वाढत आहे. परंतु देशातील काही राज्यांमध्ये अजूनही पावसाची शक्यता कायम आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये आज पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे या भागात पुढील दोन दिवस अर्थातच 16 जानेवारीपर्यंत पाऊस किंवा हिमवर्षाव होण्याची शक्यता कायम आहे.
तसेच आय एम डी ने दक्षिण भारतात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात उद्या म्हणजे 15 जानेवारीला ईशान्य मोसमी पाऊस थांबण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याची माहिती दिली आहे.
पण, आज तमिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण तामिळनाडू मध्ये पावसाचा जोर अधिक राहणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. आपल्या राज्यात मात्र आता अवकाळी पावसाचे सत्र थांबले असून राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.