Maharashtra Weather Update : यावर्षीचा मान्सून निरोप घेण्यासाठी तयार आहे. मान्सूनच्या परतीसाठी आता पोषक हवामान तयार होत असून पश्चिम राजस्थानमधून मानसूनने 25 सप्टेंबरपासून माघारी फिरण्यास सुरवात केली आहे.
दरम्यान पुणे वेधशाळेने महाराष्ट्रातून 5 ऑक्टोबर नंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल असा दावा केला आहे. अशातच राज्यात मात्र मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
नासिक जिल्ह्यातील सटाणा आणि मालेगाव तालुक्यातील काही भागांमध्ये काल पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. नासिकसोबतच राज्यातील इतरही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात काल पावसाची हजेरी लागली. यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळत आहे.
आज देखील भारतीय हवामान खात्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर हवामान खात्याच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आय एम डी ने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, शुक्रवारपर्यंत उत्तर अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या चक्रकार वाऱ्यांच शनिवारपर्यंत कमी दाब क्षेत्र तयार होणार आहे.
अशा स्थितीत राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. काल मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच आज देखील राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, आज दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच आज मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशीव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून यादेखील जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.